CM Devendra Fadnavis Daughter got 92 Percent in 10th Result 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीसला दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत. तसंच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कुटुंबासह राहण्यास गेले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

काय आहे अमृता फडणवीस यांची पोस्ट?

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

मुलगी दहावीत असल्याने वर्षा बंगल्यावर वास्तव्यासाठी गेले नव्हते देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे आपल्या लेकीच्या १० वीच्या परीक्षेसाठी गेल्या पाच महिन्यांपासून मुख्यमंत्री हे जुन्याच घरी म्हणजे सागर बंगल्यावर राहत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच ही माहिती माध्यमांना दिली होती. मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला म्हणून ‘वर्षा’ची ओळख आहे. आता या बंगल्यावर मुक्कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्यानं संजय राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळे आरोप केले होते. वर्षा बंगल्याच्या आवारात कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याचं शिंग पुरलं आहे असाही आरोप त्यांनी केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे आरोप फेटाळत वर्षा बंगल्यावर मुलीची परीक्षा असल्याने गेलो नसल्याचं सांगितलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या शाळेत शिकत होती दिवीजा?

दिवीजा ही मुंबईतील फोर्ट स्थित कैथेड्रल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. यंदाच्या वर्षी तिने दहावी बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला ९२.६० टक्के गुण मिळाले असून तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.