लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीबाबत चौकशी करून उचित कार्यवाहीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शुक्रवारी सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस आले असताना श्री. कदम यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाकडून प्रस्तावित घरपट्टीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, ही वाढ दुप्पट ते तिप्पट झाली असल्याने नागिरकांत प्रचंड असंतोष पसरला आहे. नव्याने आकारण्यात आलेले दर कोणत्या निकषाच्या आधारे आकारण्यात आले याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

घरपट्टी वाढीला विरोध नसला तरी ती संयुक्तिक व वाजवी असावी, अशी नागरिकांची भावना असून, ड वर्ग महापालिका क्षेत्रातील करआकारणीचा अभिप्राय घेऊन प्रचलित दराने आकारणी करण्यात यावी. याबाबत ज्यांना नवीन दर मंजूर आहेत, ज्यांच्या हरकती नाहीत, अशांना वगळून ज्यांच्या हरकती आहेत, त्यांच्या दरवाढीला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी श्री. कदम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासणी करून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव यांना दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही याबाबतचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला. वाढीव घरपट्टीबाबत सरकारने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.