मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रदेश भाजपकडून माजी प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन व प्रचार प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीने एकत्र निवडणुका लढविण्याबाबत शक्यतो निर्णय घेण्यात यावा, यावर जिल्हा प्रभारींनी भर द्यावा आणि मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले.
फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या जिल्हा प्रभारींची बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राज्यातील विविध भागातील संघटन मंत्री, सरचिटणीस, राज्य सरकारमधील भाजपचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक व्यवस्थापन व प्रचारप्रमुख पदाची जबाबदारी बावनकुळे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत राज्यभरात बराच प्रवास केला होता आणि संघटनेच्या बांधणीवर भर दिला होता. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बावनकुळे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुती ५१ टक्के मते घेवून व दोन-तृतीयांश बहुमताने मोठे यश मिळवेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील सर्व निवडणुकांचे विभागनिहाय सादरीकरण करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष असला पाहिजे आणि भाजप किंवा महायुतीने सत्ता मिळविली पाहिजे, यासाठी कठोर परिश्रम घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी पक्षाच्या नेत्यांना दिल्या. नागरिकांच्या घरोघरी जावून संपर्क साधावा, त्यांचे प्रश्न, समस्या समजून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत बावनकुळे म्हणाले की, महायुतीत समन्वय टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. या समन्वयासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन मंत्र्यांची समिती असेल. यामध्ये एक भाजप, एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादी असे तीन मंत्री समन्वयक म्हणून काम करणार आहेत. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी भाजप घेईल.
