काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्लीतल्या मेदांता रुग्णालयात निधन झालं आहे. एअर अँब्युलन्सने त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. काँग्रेसचे ते महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लढवय्या नेता हरवला असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी?
चंद्रपूर वरोरा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने एक तरुण, तडफदार आणि लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या अतीव दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळू धानोरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.




बाळू धानोरकर हे चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार होते. काँग्रेसचे राज्यातील ते एकमेव खासदार होते. काही दिवसांपासून बाळू धानोरकर आजारी होते. नागपुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत वाढल्याने २८ मे रोजी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीत त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज पहाटेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. मृत्यूसमयी त्यांचं वय ४७ होते. खासदार बाळु धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. अंतिम संस्कार वरोरा येथील वणी बायपास स्मशानभूमी येथे होतील.
वडिलांचंही चार दिवसांपूर्वी निधन
खासदार बाळू धानोरकर यांचे वडील नारायण धानोरकर यांचं चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन बाळू धानोरकरांनी घेतलं. परंतु, प्रकृती अस्वास्थतेमुळे ते अंंत्यसंस्काराला जाऊ शकले नाही. अखेर, आज पहाटे बाळू धानोरकर यांचंही निधन झालं. तीन दिवसात धानोरकर कुटुंबात दोन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे धानोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.