रत्नागिरी : दोन आठवडय़ांपूर्वी खेडमध्ये झालेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या (१९ मार्च ) शहरातील त्याच मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर विकासाच्या गोष्टी करण्यासाठी ही सभा होणार असल्याचे शनिवारी खेडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
पण शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी खेड परिसरात ‘करारा जवाब मिलेगा’, ‘विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ,’ असा मजकूर लिहिलेले बॅनर लावले आहेत. तसेच कदम यांचे पुत्र आमदार योगेश यांनी ‘शिवसेना – निष्ठावंतांचा एल्गार..’, अशा आशयाचा टिझर पोस्ट केला आहे. कारण कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनी ही सभा अतिशय प्रतिष्ठेची केली असून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातही शिवसेनेचे भगवे झेंडे, पताका, बॅनर, कटआउट लावण्यात आले आहेत. सभेला येणाऱ्या शिवसैनिकांच्या सोयी सुविधांसाठीही जय्यत तयारी केली जात आहे.
गेल्या ५ मार्च रोजी या मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यानंतर शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार कदम यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर लगेचच खेड दापोली मंडळी, संपूर्ण कोकणातील शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्या ही सभा आयोजित करुन शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे.
ठाकरे यांच्या सभेप्रमाणेच याही सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून दापोली विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या दुतर्फा पक्ष चिन्ह व शिवसेना नावाच्या पट्टय़ा लावण्यात आल्या आहेत. तसेच सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी भगवे झेंडे आणि भगवे पट्टे मोठय़ा प्रमाणात वाटले जात आहेत. तालुक्याच्या अंतर्गत रस्त्यांवरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका ते खेड शहरातून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात वाहनांवर ध्वनिक्षेपक लावूनही सभेचे जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे. त्यामुळे या सभेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ही ‘उत्तर सभा’ नाही – उदय सामंत
दरम्यान ही ‘उत्तर सभा’ नाही, असे स्पष्ट करून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सभेच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले की, शिवसेना आमदारांना बदनाम करणाऱ्यांना उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही विकासाच्या गोष्टी सांगण्यासाठी सभा घेत आहोत आणि या सभेतच आमदार कदम यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रातील व कोकणातील जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांची माहिती जनतेला व्हावी म्हणून ही सभा होणार आहे. शासन घेत असलेल्या ऐतिहासिक निर्णयांवरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी काही जण सभा घेतात. इतरांची बदनामी करण्याव्यतिरिक्त त्यांना इतर कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही. ज्यांनी यापूर्वी शिवसेनेच्या कोटय़ातून दिलेले पैसे राष्ट्रवादीला देण्याचे काम केले त्यांना योगेश कदम यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही.
जागावाटपाबाबत एकत्र निर्णय घेणार
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत शुक्रवारी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री सामंत म्हणाले की, भाजप व शिवसेना एकत्र मिळून सरकार चालवत असून भविष्यातील सर्व निवडणुका युती म्हणूनच लढवल्या जातील. जागा वाटपाचा निर्णयही भाजप व शिवसेनेचे नेते एकत्र बसून घेतील.