scorecardresearch

उद्धव ठाकरे पुन्हा टॉप-५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांवर मात्र जनता नाराज, सर्वेक्षण काय सांगते?

या सर्वेक्षणातून हेही समोर आलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. असं असलं तरी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी जनतेला फारशी पटलेली दिसत नाही.

uddhav thackeray

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर ४३ टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी ७१ टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली.

हेही वाचा – India Today CVoter Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार; पण भाजपाला बसेल मोठा धक्का, काँग्रेस तर…

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चौथा क्रमांक लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ६१.८ टक्के जनता समाधानी आहे. तर, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. दरम्यान, सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्व शर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल , राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा क्रमांक आहे.

या सर्वेक्षणातून हेही समोर आलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सर्व्हेमध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी आजही पहिली पसंती असल्याचं दिसत आहे. ५३ टक्के लोक आजही नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं मानतात. फक्त ७ टक्के लोकांनी राहुल गांधींना पसंती दर्शवली आहे. ६ टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ आणि ४ टक्के लोकांनी अमित शाह यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली आहे. असं असलं तरी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी जनतेला फारशी पटलेली दिसत नाही. टॉपच्या मुख्यमंत्र्यांपैकी केवळ एकच मुख्यमंत्री हा भाजपाचा असल्याचं दिसून आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister uddhav thackeray among top 5 chief ministers in india vsk