मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शुक्रवार (दि ३१) पासून तीन दिवसांसाठी सहकुटुंब महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. राज्याच्या कारभाराची धुरा हाती घेतल्या नंतर प्रथमच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाबळेश्वरला येत असल्याने स्थानिक प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

महाबळेश्वर हे ठाकरे कुटुंबाचे आवडते पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री ठाकरे उद्या शिवसेनेच्या एका आमदाराच्या मुलीच्या विवाहसमारंभाच्या निमित्त येणार आहेत. यावेळी ते अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार असल्याचेही समजते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीव आज दिवसभर प्रशासनाची धावपळ सुरू होती.
वन विभागाकडून पोलो मैदानावर हेलिकॉप्टर उतरण्यास मज्जाव करण्यात आलेला असल्याने हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी अन्य जागेचा देखील स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणी शोध घेतला जात होता. वेण्णालेक येथील पठारासह महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर असलेल्या वेलोसिटी मधीलही जागा पाहण्यात आली.

दरम्यान आज सुरक्षेसाठी जिल्हयाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक महत्वाची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला. यावेळी उपअधिक्षक अजित टिके प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील, पोलीस निरीक्षक बी ए कोंडुभैरी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.