scorecardresearch

मुख्यमंत्र्यांचा महिन्यात दुसऱ्यांदा सातारा दौरा; पर्यटन तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी विविध निर्णय

आपले मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे.

मुख्यमंत्र्यांचा महिन्यात दुसऱ्यांदा सातारा दौरा; पर्यटन तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी विविध निर्णय
मुख्यमंत्र्यांचा महिन्यात दुसऱ्यांदा सातारा दौरा; पर्यटन तसेच उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी विविध निर्णय

विश्वास पवार

वाई : आपले मूळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. दोन आठवडय़ांत दोनदा आपल्या मूळ गावी दौरा केलेल्या शिंदे यांनी जिल्ह्याचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन विकास आणि उद्योगवाढीला प्राधान्य दिले आहे. दुर्गम आणि कायम दुर्लक्षित राहिलेल्या आपल्या जन्मभूमी कांदाटी खोऱ्याच्या विकास आराखडय़ाला मंजुरी देत कोयना धरणामुळे विस्थापित १०५ गावांच्या विकासाला बळ देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विकासापासून शेकडो मैल दूर असणाऱ्या कायम दुर्लक्षित राहिलेल्या दुर्गम आणि डोंगराळ कांदाटी खोऱ्याच्या विकास आराखडय़ाला मंजुरी देत तेथील विकासकामांना चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनवाढ आणि विकासकामांना प्राधान्य दिले. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जोडल्याशिवाय विकास गतिमान होणार नाही हे ओळखून त्यांनी प्रशासनाला सोबत घेऊन काम सुरू केले.

चारशे पन्नास कोटींची मंजुरी

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागांत पर्यटनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपटी ते तापोळासाठी १५० कोटी आणि कास ते बामणोलीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहीर हा तेरा किमीच्या १७५ कोटी खर्चाच्या केबल स्टे पुलाचे काम सुरू झाले आहे. पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर, महाबळेश्वर येथे पार्किंगची समस्या असून दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच महाबळेश्वरच्या सुशोभीकरणासाठी उर्वरित निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्रतापगडचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात आला असून प्रतापगडसाठी सुकाणू समितीही नेमली आहे. दुर्गम भागातील नागरिकांसाठी मिनी बस देण्यात येणार आहेत. कोयनेच्या शिवसागर जलाशयात बोट क्लबला रीतसर परवानगी देणे, बार्ज खरेदी करणे, बेल एअरसाठी तीन कोटींचा निधी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी, इको सेन्सिटिव्ह झोनमधील गावांचा विकास, महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीसाठी तज्ज्ञ लोकांची नेमणूक करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार आहेत.

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी ५० लाख रुपये

   महाबळेश्वर येथे मुख्य प्रवेशद्वारावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी पन्नास लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी येथे साडेसात टीएमसीचे नवीन धरण प्रस्तावित केले असून त्याच्या सुरुवातीच्या तांत्रिक कामांसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाला तातडीची मंजुरी दिली. यामुळे पाणी असूनही उन्हाळय़ातील या गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल. बोंडारवाडी धरणाच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुस्तकांचे गाव भिलारला ब वर्ग पर्यटन दर्जा देण्यात येईल. पर्यटनवाढीसाठी महाबळेश्वर, पाचगणी, कास पठारावरील कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील. सुरुर वाई पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर या सातशे कोटी रुपये खर्चाच्या पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जोडणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी  देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी व बांधकाममंत्री नितीन गडकरी यांना केली.

वाई खंडाळा महाबळेश्वर या आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांचे प्रस्ताव घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. नव्या सरकारने राज्यातील अनेक कामांना स्थगिती दिली आहे. या स्थगिती आदेशामुळे मतदारसंघातील अनेक कामे बंद पडली होती. ती सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना केली आहे. आता ही सर्व कामे सुरू होतील अशी अपेक्षा आहे. पर्यटकांसाठी महाबळेश्वर येथे वेगवेगळय़ा ठिकाणी वाहनतळांची निर्मिती करावी, तसेच हैदराबाद येथील एनटीआर उद्यानाप्रमाणे पर्यटनवाढीसाठी स्नो वल्र्ड म्युझिकल फाउंटन व लेझर शो केल्यास पालिकेच्या उत्पन्नात भर पडून रोजगारात वाढ होईल.

  – मकरंद पाटील, आमदार, वाई खंडाळा महाबळेश्वर

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या