लहान मुले व्यसनाच्या आहारी

मालकांकडून कामगार वा त्यांच्या मुलांना दारू, ताडीसारखे नशिले पदार्थ मागविले जातात

सोलापूर : यंत्रमाग आणि विडी कारखाने मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सोलापूर शहरात झोपडपट्टय़ांची संख्या जास्त आहे. बालकामगारांचाही प्रश्न आहे. परंतु अलीकडे लहान अल्पवयीन मुले स्वत: दारू, ताडीसारख्या व्यसनामध्ये अडकताना दिसून येतात.

शहराचे नवे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या निदर्शनास ही बाब आढळून आली असून पोलिसांनी विविध सहा ठिकाणी घातलेल्या धाडींमध्ये लहान अल्पवयीन मुले हातभट्टी दारू, ताडी, गुटखा  खरेदी करताना सापडली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या माध्यमातून झालेल्या या कारवाई सत्रात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत असल्याची बाब समोर आली आहे. कन्ना चौक, जुना विडी घरकुलासह अन्य भागांत झालेल्या कारवाईत सहा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेत पोलीस आयुक्त बैजल यांनी ही कारवाईची मोहीम राबविताना काही अल्पवयीन लहान मुलांना तोतया ग्राहक म्हणून पाठविले होते. मुलांच्या हातात पाठय़पुस्तकांऐवजी नशिले पदार्थ सहजपणे उपलब्ध होतात. ही बाब गंभीर असल्याचे नमूद करीत, पोलीस आयुक्त बैजल या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. ‘लहान मुलांना नशिले पदार्थ मिळणे ही बाब अतिशय संवेदनशील आणि मनाला अस्वस्थ करणारी आहे. मालकांकडून कामगार वा त्यांच्या मुलांना दारू, ताडीसारखे नशिले पदार्थ मागविले जातात. मुलांसमोरच या गोष्टी घडत असल्याने ही मुलेसुद्धा त्याचे अनुकरण करू लागतात. याविषयी मालक, पालक व संबंधितांचे दुर्लक्ष झाल्यामुळे मुलेही व्यसनांना बळी पडत आहेत. शिक्षकांनी शाळेत मुलांना मार्गदर्शन करताना त्यापासून परावृत्त केले तरच भावी पिढी वाचेल,’ असे सामाजिक घडामोडींचे विश्लेषक प्रा. विलास बेत यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Children addicted to alcohol and toddy zws

ताज्या बातम्या