प्रशांत देशमुख

योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप हेच मुलांसाठी लसीकरण समजावे – डॉ. सचिन पावडे

वर्धा : कोविडमुक्त पालकांच्या कुटुंबातील मुलांना कोविडसदृश्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. पूर्व खबरदारी म्हणून मुलांना योग्य आहार, व्यायाम व झोप मिळण्याची काळजी घ्यावी. मुलांसाठी तेच लसीकरण झाल्याचे समजावे, असा सल्ला प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी दिला आहे.

वैद्यकीय मंचतर्फे  करोना काळात विविध प्रतिबंधात्मक उपाय सुचवले गेले. आता कोविडच्या तिसऱ्या लाटेत बालक व लहान मुलं प्रभावित होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी बालरोग तज्ज्ञांचे कृतीदलसुद्धा स्थापन केले आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. पावडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपले निरीक्षण नोंदवले.

पहिल्या लाटेत मुलं घरातच होती. पालकांमुळे करोना कुटुंबात आला. संचारबंदी उठल्यानंतर मुलं मोठय़ा संख्येने घराबाहेर पडली. त्यांचं खेळणं वाढले. त्यामुळे आता मुलांपासून पालकांना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवर मोठय़ा संख्येत लसीकरण झाले. त्यांच्याकडील मुलांचे लसीकरण व्हायचे आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेत मुलं बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांचे वय कमी राहिले. आता तिसऱ्या लाटेत त्यापेक्षा कमी म्हणजेच मुलांना बाधा होण्याची शक्यता बळावते. प्रामुख्याने करोनामुक्त पालकांच्या कुटुंबातील मुलांना धोका राहील. पालक बाधित असताना मुलांनाही कोविड लागण होऊन गेल्याची शक्यता असते. लक्षणे दिसत नाही. मात्र कोविड सदृश्य लक्षणे पुढे दिसू लागतात. त्याची चाचणी नकारात्मक येते. मात्र दोन ते तीन आठवडय़ात डोळे लाल होणे, खूप ताप, अंगावर चट्टे किंवा पूरळं उमटणे, सुस्ती येणे, चिडचिड, जीभ लाल होणे, अशा स्वरूपातील लक्षणे (मल्टी सिस्टीम इम्फ ॉर्मलिटी सिंड्रोम) दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. मोठय़ा प्रमाणात शरीरात तयार झालेल्या प्रतिजनांमुळे शरीरातील इतर अवयवांना धोका निर्माण होतो. संसर्गक्षमता वाढते. त्यादृष्टीने त्यावर काळजी घेणे आवश्यक ठरले आहे. टाळेबंदीचे र्निबध असले तरी घरच्या घरी दोरीवरच्या उडय़ा, पायऱ्या चढणे, गच्चीवर फि रणे अशा स्वरूपातील व्यायाम पालकांनी स्वत: मुलांसोबत करावे. पुरेशी झोप आवश्यक आहे. मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे. त्याबरोबरच जंकफू ड टाळावे. शक्य  झाल्यास फ लाहार, न्याहारी, घरगुती सरबत मुलांना दिले पाहिजे. हेच मुलांसाठी लसीकरण ठरेल. मधल्या काळात व्यायाम, झोप मुलांसाठी पारखी ठरल्याने वजन वाढले. माझ्याकडे आलेल्या बहुतांश बालकांत लठ्ठपणा दिसून आला. आताही अशीच मुलं करोनाच्या तिसऱ्या फे रीत बाधित होऊ शकतात. मुलांचा ‘स्क्रिन टाईम’ म्हणजेच टीव्ही, मोबाईलवरील वेळ कमी करण्याचा प्रयत्न पालकांनी केला पाहिजे. मुखपट्टी लावल्याखेरीज मुलं घराबाहेर पडू नये. अधिकाधिक संवाद वाढवावा. घरगुती छंद जोपासावे, असा सल्ला डॉ. पावडे देतात. मुलं हीच आपली संपत्ती असल्याचे आपण म्हणतो. आता ती जपण्याचे मोठे आव्हान उभे आहे. काळजी घेतल्यास ते परतवून लावू, अशी भूमिका त्यांनी मांडली.