“नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत”; भास्कर जाधवांची टीका

“शिवसेना सोडल्यापासून शिव्या देऊन नारायण राणेंनी आपलं अस्तित्व टिकवलं आहे. यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नाही” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

Children like Narayan Rane children should not be born in Maharashtra Bhaskar Jadhav criticizes
नारायण राणेंचा शिवसेनेच्या वाढीवमध्ये काडीचा हातभार नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची दोन्ही पुत्र आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांवरुन अनेकदा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या याच वक्तव्यांवरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं असून नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असं म्हटलं आहे.

लोकशाही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे. “नारायणराव राणेंना मी सल्ला देऊन काही फायदा नाही. कारण त्यांची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, थोरामोठ्यांचा आदर करणाऱ्या राज्यामध्ये पक्ष वेगवेगळे असू शकतात मतमतांतर वेगळी असू शकतात पण आपण कोणती भाषा कोणाबद्दल वापरतो याचं अजिबात भानं नाहीए. आपण कोणाबद्दल काही भाषा वापरायची पण दुसऱ्याने त्याचा प्रतिवाद करायचा नाही. अशी जी मुलं आहेत किंवा नारायण रावांबद्दल बोलायला मला इच्छा सुद्धा होत नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले.

आणखी वाचा- “थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी फटकारलेल्या ‘त्या’ घटनेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“नारायण राणेंचा शिवसेनेच्या वाढीवमध्ये काडीचा हातभार नाही. त्यांनी स्वतःभोवती ते वलय तयार केलं आहे. नारायण राणेंना माध्यमांनी मोठं केलं आहे आणि शिवसेना सोडल्यापासून शिवसेनेला शिव्या देऊन त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलं आहे. यापेक्षा नारायण राणेंचा काही करिश्मा नाही,” असंही भास्कर जाधवांनी म्हटलं आहे.

“नारायण राणेंनी जेंव्हा शिवसेना सोडली तेव्हा ९ आमदार त्यांच्याबरोबर गेले. दुसऱ्या निवडणुकीमध्ये एक तरी आमदार निवडून आला का? त्याच्या पुढच्या निवडणुकीत ते स्वतः निवडून आले का? त्यांचा मुलगा पुन्हा निवडून आला का? ते वांद्रे येथून उभे राहिले तेव्हा निवडून आले का? त्यांनी आपला पक्ष काढला आणि त्याचा वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी वर्ष पूर्ण होण्याआधी त्याचं वर्षश्राद्ध घातलं. स्वतःच्या मुलाला निवडूण आणू शकत नाही म्हणून भाजपाच्या दरवाजात जाऊन उभे राहिले. ते काय शिवसेनेला शिव्या देणार आणि कसली पाळमुळं रोवणार,” असा सवाल भास्कर जाधव यांनी यावेळी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Children like narayan rane children should not be born in maharashtra bhaskar jadhav criticizes abn