संमेलनाध्यक्षा कांचन सोनटक्के यांचे प्रतिपादन

मराठी बालरंगभूमी समृद्ध होण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी तिला सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे स्वरुप आले पाहिजे. व्यवसायापेक्षा व्यक्तिमत्त्व विकासाचा राजमार्ग चोखाळल्यास रंगभूमीला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाटय़ संमेलनाच्या अध्यक्ष कांचन सोनटक्के यांनी शनिवारी केले. सोलापूर येथे बालनाटय़ संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
बालरंगभूमीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी एक आवश्यक बाब म्हणजे या चळवळीच्या वेगवेगळ्या उपक्रमांत शालेय विद्यार्थाचा सहभाग वाढायला हवा. बालकलाकर म्हणून, प्रेक्षक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून नाटय़माध्यमाचा शाळांमध्ये, विद्यार्थाच्या वेगवेगळ्या क्षमता आणि ऊर्जा वाढीस लागण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असे सोनटक्के म्हणाल्या.
‘मुलांना सुटीच्या काळात महिनाभर कशातरी गुंतवण्याचा उपक्रम म्हणून न बघता बालनाटय़ाकडे एक संपूर्ण नाटय़ानुभव, जीवनाभुव म्हणून पाहिले पाहिजे. नाटक ही केवळ मौजमजेची, वेळ घालवण्याची फुरसतीची गोष्ट न राहता, स्वत: बरोबरच इतरांचे रंजन करणारी, मनोरंजमातून समाजाचे उद्बोधक आणि उत्थाम करणारी ती एक उपचार पद्धती व्हावी’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी आपल्या भाषणांत कांचन सोनटक्के यांच्या कामाचे कौतुक केले. पहिले बालनाटय़ संमेलन सोलापुरात होत आहे. याचा अभिमान वाटतो. कांचनताईमुळे येणाऱ्या दिवसांत बालनाटय़ संमेलनाचा विस्तार वाढेल असे ९५ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाध्यक्षा फैय्याज यांनी नमूद केले.