scorecardresearch

पराग बोरसे यांच्या चित्रकलेची चीनकडून दखल ; पेस्टल मासिकात स्थान मिळवणारे एकमेव भारतीय चित्रकार

लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या पराग बोरसे यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आहे.

अलिबाग– कर्जतच्या प्रसिद्ध चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्रकलेची चीनने दखल घेतली आहे. मकाऊ इंटर कल्चर लिमिटेडने प्रकाशित केलेल्या इंटरनॅशनल पेस्टल मासिकाच्या ‘पेस्टल वल्र्ड’ या पहिल्या आवृत्तीमध्ये चित्रकार पराग बोरसे यांच्या कलाप्रवासावरील लेख  प्रकाशित झाला आहे. या मासिकात स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय चित्रकार ठरले आहेत.

लहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या पराग बोरसे यांनी मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले आहे. २००३ पासून चित्रकला क्षेत्रात ते कार्यरत आहेत. व्यक्तिचित्र रेखाटणे ही त्यांची खासियत आहे. आज जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीत २००८, २०१४ आणि २०१७ मध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नेहरू सेंटर येथील कला दालनात २००८.२०११,२०१४ अशी तीन चित्र प्रदर्शने झाली आहेत. पुणे, दिल्ली, ओरिसा येथील चित्र प्रदर्शनांत त्यांनी सहभाग घेतला आहे. दुबई आणि थायलंड येथेही त्यांची व्यक्तिचित्रे प्रदर्शित झाली आहेत.      २०२० मध्ये अमेरीकेतील पेस्टल जरनलमार्फत दरवर्षी चित्रकारांची जागतिक स्पर्धा आयोजित केली जात असते. या चित्रकला स्पर्धेत जगभरातील निवडक १०० चित्रकारांची चित्रे निवडली जातात. यातील १९ चित्रांना पुरस्कार दिला जातो. यात पराग यांच्या व्यक्तिचित्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. गेल्या २१ वर्षांत या पुरस्कारासाठी निवड होणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार ठरले होते. २०१७ मध्ये कॅलिफोर्नियात झालेल्या पेस्टल चित्रकला स्पर्धेत पराग यांच्या रिंकल्स अ‍ॅण्ड रुस्टर्स या चित्रालाही पुरस्कार प्राप्त झाला होता. अमेरिकेतील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका यांच्यामार्फत दरवर्षी न्यू यॉर्क येथे जगभरातील चित्रकारांचे चित्र प्रदर्शन भरविले जाते. यात सलग दोन वेळा पराग यांची चित्रे निवडली गेली. २०१७ आणि २०१८ अशा दोन वेळा त्यांना ही संधी मिळाली. त्याच्या चित्रकलेची दखल घेऊ कर्नाटक सरकारने त्यांना युवा कुंचा कलाश्री पुरस्काराने २०१७ मध्ये सन्मानित केले आहे, तर २००९ मध्ये पुण्यातील पंडित सातवळेकर संस्थेने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. कर्जत येथील लाइट ऑफ लाइफ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ते आदिवासी वाडय़ावरील मुलांना चित्रकलेची मोफत ट्रेिनग देत असतात. कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी त्यांनी आपली चित्रे दान केली आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षी सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुण्यात एका चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात पराग यांच्याही चित्रांचा समावेश होता. चित्रकला क्षेत्रात पराग यांची वाटचाल ही लक्ष्यवेधी ठरली आहे. त्यामुळे ‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.  चीनच्या ‘मकाऊ इंटरकल्चर लिमिटेडने प्रकाशित पेस्टल वर्ल’  मासिकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये चित्रकार पराग बोरसे यांच्या कलाप्रवासावरील लेख  प्रकाशित  झाला आहे. या आवृत्तीमध्ये जगभरातील अनेक नामांकित चित्रकारांची कामे आणि लेख समाविष्ट आहेत. पराग बोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत, ज्यांचे काम या मासिकात  त्यांच्या चित्रांसहित प्रकाशित केले आहे. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: China magazine publish article on parag borse paintings zws

ताज्या बातम्या