मुख्यमंत्र्यांचे टीकात्मक सल्ले, राणेंची सेनानेत्यांवर आगपाखड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेंगुर्ले : चिपी विमानतळाच्या उद्घाटनात शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात कलगीतुरा रंगला. आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टीका केली, तर सेनानेत्यांची छायाचित्रे दाखवत, याच लोकांनी येथे रस्त्याचे कामही अडवले होते, असा आरोप राणे यांनी केला.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते शनिवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री राणे आणि मुख्यमंत्री ठाकरे एका व्यासपीठावर उपस्थित होते. हे दोन्ही नेते व्यासपीठावर एकमेकांशेजारी बसले होते, परंतु कार्यक्रमात त्यांनी एकमेकांकडे पाहिलेसुद्धा नाही. राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांनी कोकणासाठी काहीही केले नाही, केवळ विकासकामांत अडथळे निर्माण करून कंत्राटदारांकडून गाड्या पदरात पाडून घेतल्या, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर विमानतळ उद्घाटनात दोन्ही ठाकरे आणि राणे एकाच व्यासपीठावरून काय बोलतात, याबद्दल उत्सुकता होती.

भाषणाच्या सुरुवातीलाच ‘‘आजचा दिवस आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे,’’ असा टोला लगावत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘मातीचा काही संस्कार असतो, मातेचे संस्कार असतात. या मातीत बाभळीचीही झाडे उगवतात, तशीच आंब्याची झाडे उगवतात. माती  जोपासते. कोणी काही म्हणाले तरी शिवसेनेचे कोकणाशी वेगळे नाते आहे. कोणी काय केले हे ज्याचे त्याचे मत आहे; पण हा विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी इतकी वर्षे का लागली, इतकी भांडेघाशी का करावी लागली आणि आता तो का झाला, याचाही विचार करायला हवा.’’

राणे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांची उद्घाटनातही पुनरावृत्ती केली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह काही वर्षांपूर्वी आपण या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो, असे सांगत, राणे यांनी त्या वेळी विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांची छायाचित्रे दाखवली आणि याच लोकांनी येथे रस्त्याचे कामही अडवले होते, असा आरोप नाव न घेता शिवसेनेवर आरोप केला.

पाठांतर करून बोलणे वेगळे, तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे आणखी वेगळे. खोटे बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकले होते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. राऊतांनी तुम्हाला पेढा दिला. त्या पेढ्यातील गोडवा अंगी बाणवावा लागतो. सगळीकडेच राजकारण करून चालत नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परवानगीसाठी तुम्ही फोन केल्यानंतर मी लगेच अर्जावर सही केली होती, असे स्मरणही ठाकरे यांनी राणे यांना करून दिले.

या विमानतळाच्या माध्यमातून कोकणाने विकासाच्या दिशेने गरुडभरारी घेतली आहे. त्यामध्ये राजकीय जोडे आणू नका. तलवार आपापसात नको, शत्रूवर चालवा. तुम्हाला मिळालेल्या संधीची माती करू नका, सोने करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना दिला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आपण या परिसराचा सर्वांगीण विकास केला. बाकी कुणी काहीही केलेले नाही, असाही दावा राणे यांनी केला. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना, त्यांनी या प्रदेशाच्या विकासाबाबत टाटा इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून पर्यटनाचा आराखडा बनवावा, अशी सूचना केली.

कोकणाच्या विकासात राजकीय जोडे आणू नका. तलवार आपापसात नको, शत्रूवर चालवा. तुम्हाला मिळालेल्या संधीची माती करू नका, सोने करा. 

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

राणे एकाकी?

राणे यांनी शिवसेनेच्या उपस्थित लोकप्रतिनिधींवर व्यक्तिगत आरोप केले, पण बाकी सर्व नेत्यांनी समयोचित भाषणे केली. व्यासपीठावर राणे वगळता भाजपचा कोणीही नेता नव्हता. त्यामुळे या श्रेयवादाच्या लढाईत ते एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले. सभासंकेतांनुसार त्यांच्या भाषणानंतर बोलण्याची संधी मिळालेल्या मुख्यमंत्र्यांनी राणेंवर टोले आणि टोमण्यांचा मारा केला.

नेत्यांचा ऐक्याचा राग

मुख्यमंत्री ठाकरे वगळता, सर्व मंत्र्यांनी या सोहळ्याचे स्वरूप लक्षात घेऊन कोकणच्या विकासासाठी ऐक्याचा राग आळवला. हा विमानतळ हे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे स्वप्न होते, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अधोरेखित केले, तर असे प्रकल्प कोणी एकच व्यक्ती राबवू शकत नाही, त्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात, असे अजितदादांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या मताला दुजोरा दिला.

कोकण वैश्विक पातळीवर  नेऊ  : ज्योतिरादित्य शिंदे सुमारे ५०० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचे स्मरण होत असल्याचे नमूद करून हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी, ‘‘शिंदे, होळकर, गायकवाड इत्यादींच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्यामुळे कोकण स्वातंत्र्य उपभोगू शकले. म्हणून माझ्या दृष्टीने हा फार भावुक क्षण आहे,’’ अशी भावना व्यक्त केली. माझ्या वडिलांनी, दिवंगत माधवराव शिंदे यांनी, तीन दशकांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीच्या माध्यमातून कोकणचे वैभव वैश्विक पातळीवर नेऊ या, असे आवाहनही शिंदे यांनी केले. वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

एकजूट कायम ठेवा!

कोकणचे नैसर्गिक सौंदर्य, किल्ल्यांचा  इतिहास, आंबे, काजू, मासे इत्यादी उत्पादने आपल्याला देशाच्या आणि जगाच्या पाठीवर घेऊन जायची आहेत, असे प्रतिपादन करून केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री शिंदे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते व्यासपीठावर एकत्र आले आहेत. ही एकजूट कायम ठेवून आपल्याला हा विकास साधायचा आहे. या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सकारात्मक चर्चेचाही शिंदे यांनी आवर्जून उल्लेख केला.

इथे येऊन राजकारण करू 

नये असे मला वाटत होते. चिपी विमानतळावर विमाने पाहून आनंद वाटला. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब भेटले. माझ्या कानात काहीतरी बोलले, पण मी एकही शब्द ऐकला नाही.

महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे माझा समज  असा आहे की, निदान सिंधुदुर्ग किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. अन्यथा कोणी तरी म्हणेल  मीच बांधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chipi airport in the opening chief minister uddhav thackeray and union minister narayan rane akp
First published on: 10-10-2021 at 02:15 IST