चिपळूण : महसूल विभागातील भ्रष्ट कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यात उघडकीस आली आहे. सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला खरेदीखताची नोंद मंजूर करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार ५ ऑगस्टला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून, दिवसभर या प्रकरणाची परिसरात जोरदार चर्चा रंगली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कामात कोणतीही प्रगती होत नव्हती. अखेर नोंद मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला.
या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचला. त्यानुसार अनिल जाधव याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच याच मंडळ अधिकाऱ्याविरोधात मनमानी कारभार, नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावणे, महसुली कामांमध्ये जाणूनबुजून विलंब करणे आणि आर्थिक व्यवहारांसाठी दबाव टाकणे अशा गंभीर तक्रारी लोकप्रतिनिधींकडे करण्यात आल्या होत्या. आता झालेल्या कारवाईमुळे त्या सर्व आरोपांची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांची कामे वेळेत, नियमांनुसार आणि कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय पूर्ण व्हावीत, तसेच अशा भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
