चिपळूण : लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्याविरोधात सोमवारी हजारो ग्रामस्थांनी दणदणीत मोर्चा काढत कारखाना तात्काळ बंद करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाने सोमवारी उग्र रूप धारण केले.

कारखान्यात तयार होणारे पीफास हे रसायन पर्यावरणास तसेच मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी ‘पीफास हटाव, कोकण बचाव’, ‘लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

दरम्यान, या मागणीसाठी गेल्या ७६ दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू आहे. अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला आता जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. प्रशासनाने अद्याप ठोस दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मोर्चादरम्यान पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासनाच्या सूचनेनुसार कारखान्यापासून काही अंतरावर मोर्चा थांबवण्यात आला.

यावेळी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला निवेदन सादर करत कारखाना बंद करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

“कंपनीविरोधात सर्व शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाला काही दिवसांची मुदत दिली असून, त्या कालावधीत कारखाना बंद झाला नाही तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल.” – रवी गोवळकर, ग्रामस्थ, लोटे