रत्नागिरी: चिपळूणच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत विरोधकांना थेट राजकीय इशारा दिला.
“पक्षप्रवेश विश्वासाने होतो; कुणीही सहजपणे आपले जुने राजकीय घर सोडत नाही. तिथे काहीतरी दुखावले गेले म्हणूनच हे कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. आता त्यांना आपलेपणाची जाणीव देणे ही आमची जबाबदारी आहे,” असे ठाम वक्तव्य आमदार राणे यांनी केले.
राणे पुढे म्हणाले, “परिमल, राजकीय भवितव्याची अजिबात चिंता करू नकोस. तुझं भविष्य शंभर टक्के शिवसेनेत उज्ज्वल आहे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली.
या सोहळ्यास शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी नव्या प्रवेशकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
परिमल भोसले यांच्यासह भाजपा माजी कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, माजी सेक्रेटरी उदय घाग, माजी बुथ अध्यक्ष सुधीर पानकर, मनसे माजी विद्यार्थी तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद पाटील, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष सचिन गाडे, सर्वेश सातपुते, मंगेश शिंदे, अमित शिंदे आदींनी शिवसेनेत प्रवेश करून चिपळूणच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला.
प्रवेशप्रसंगी परिमल भोसले यांनी आमदार राणे, सदानंद चव्हाण व उमेश सकपाळ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देत कृतज्ञता व्यक्त केली.
आमदार राणे यांनी कार्यकर्त्यांविषयी बोलताना भावनिक सूरही लावला. “चिपळूणमधील असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केले. परिमलसारखे सहकारी देवासारखे आहेत,” असे ते म्हणाले. काँग्रेसमध्ये असताना भोसले यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिल्याची आठवण करून देत त्यांनी भोसले यांच्या कार्यतत्परतेचेही कौतुक केले.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे चिपळूणमधील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून, आगामी काळात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढण्याचे संकेत या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. विरोधकांसाठी हा धक्का मानला जात असून, शिवसेना आता संघटनात्मक आक्रमकतेसह मैदानात उतरल्याचे चित्र या सोहळ्यातून स्पष्ट झाले.
