चिपळूण: चिपळूण नगरपरिषद निवडणूकीत ऐनवेळी महायुतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाला बाजूला करण्यात आले. या निवडणूकीत भाजप शिंदेसेनेला यश आल्यानंतर तोच फॉर्म्युला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राबवण्यात आला. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटासाठी महायुतीचे दरवाजे कायमचे बंद, असे खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र आता चिपळूण पंचायत समितीत सत्तेची गणिते बांधताना व ठाकरे गटाला बाजूला करण्यासाठी त्याच राष्ट्रवादीसाठी महायुतीचा दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे. त्यानुसार राजकीय चर्चा व अंतर्गत घडामोडी सुरू आहेत.
महायुतीतील मित्र पक्ष भाजप व शिंदेसेनेवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट नगरपरिषद निवडणूकीत गाफिल राहिला होता. मात्र ऐनवेळी महायुतीतून राष्ट्रवादीला बाजूला केल्याचे लक्षात येताच आमदार शेखर निकम यांच्या नेतृ्त्वाखाली उमेदवारी अर्ज भरताना अक्षरशः तारांबळ उडाली. शेवटी २८ जागांपैकी १५ जांगावर उमेदवार देण्याची वेळ आमदार निकम यांच्यावर आली होती. या निवडणूकीत स्वबळावर लढताना केवळ दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या.
निवडणूकीत एकहाती सत्ता मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला चार हात लांब ठेवण्याची घोषणा केली. भाजप शिंदेसेना युतीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत एकहाती सत्ता मिळवता आली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वाधिक सात, ठाकरेसेनेला ४ तर शिवसेना भाजप युतीला ७ जागा मिळाल्या. या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच सभापतीपदासाठी जो पाठींबा देइल त्यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा आमदार निकम यांनी केला होता.
राष्ट्रवादीची मुख्य लढत ही युतीच्या उमेदवारांसोबत झाली होती. त्यामुळे युतीला सोडून ठाकरेसेने सोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरवातीला सुरू होत्या. मात्र ठाकरेसेना सत्तेत सहभागी होऊ नये, यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू आहेत. निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादीला महायुतीचे दरवाजे कायमचे बंद असल्याची घोषणा पालकमंत्र्याकडून झाली. मात्र आता राष्ट्रवादीला सोबत घेण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे युतीच्या निदर्शनास आले आहे. मांडकी पालवण येथील साहित्य संमेलन दरम्यान राष्ट्रवादी सोबत महायुती होण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे एकमेका विरोधात लढणारे पुन्हा सत्तेसाठी एकत्र येतात की नाही, याची ग्रामस्थांनी उत्सुकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका म्हणत सर्वच पक्षाच्या प्रमुखांच्या भावना कार्यकर्त्यांप्रती उफाळून आल्या होत्या. कुठेही तडजोड न करता कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भावनेने कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले होते.
कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवणाऱ्या महायुतीतील घटक पक्ष आता सत्तेसाठी एकत्र येणाची शक्यता आहे. या निवडणूकीतून कार्यकर्त्याना किती न्याय मिळाला, किती कार्यकर्ते कर्जाच्या खाईत लोटले गेले, यापेक्षा आता सत्तेची गणिते बांधली कशी जातात याकडेच साऱ्यांचे लक्ष असल्याचे दिसत आहे.

