scorecardresearch

तिवरे धरण दुर्घटना: आतापर्यंत १८ मृतदेह हाती

शोधकार्य अद्यापही सुरूच

तिवरे धरण दुर्घटना: आतापर्यंत १८ मृतदेह हाती
फोटो सौजन्य : एएनआय

रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण मंगळवारी रात्री उशीरा फुटले आणि हाहाकार उडाला. गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १८ वर पोहोचला असून ५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर तिवरे धरणापासून ३५ किलोमीटर अंतरावर वसिष्ठी नदीत आढळून आलेला महिलेचा मृतदेह हा तिवरे धरण फुटीनंतर बेपत्ता झालेल्यांपैकीच एक असल्याचे निश्चित झाले आहे.

तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या घटनेचा फटका बसला आहे. तसेच दुर्घटनेत अनेक जण वाहून गेल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहिमेदरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत १३ जणांचे मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर गुरूवारी पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधकार्यादरम्यान आणखी मृतदेह सापडले आहेत.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटल्याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तसेच या दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली होती. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या लिकेजबाबत स्थानिक लोकांनी आमदार,खासदार आणि संबंधित अधिकार्‍यांना कल्पना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या