परभणी: देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी ही काळाची गरज असून, अन्न प्रक्रिया उद्योगातूनच शेतकरी, युवक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा शाश्वत विकास शक्य आहे. युवकांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे होण्यासाठी संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालयात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ३ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या सामायिक नवउद्यम उभारणी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पासवान यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. रामराव वडकुते, खासदार संजय जाधव, प्रभारी जिल्हाधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, कुलगुरू डॉ. इंद्र मणि, डॉ. भगवान आर्सेवार, विनय आवटे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पासवान म्हणाले की, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. अधिक प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे भारतीय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अडचणी येत असून यासाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार हाच पर्याय आहे.भारताला ‘ग्लोबल फूड बास्केट’ म्हणून ओळख निर्माण व्हावी आणि जगातल्या प्रत्येक जेवणाच्या टेबलावर किमान एक भारतीय खाद्यपदार्थ असावा, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शेती संवर्धन आणि अन्न सुरक्षा यासाठी केंद्र शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हिंगोली व मराठवाडा विभागातील कृषी क्षेत्रावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी खासदार रामराव वडकुते, कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांची भाषणे झाली. अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून देशात सुमारे २४ हजार उद्योग उभे राहिल्याचे नमूद करत देशातील २१ राज्यांतील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याने हे विद्यापीठ भारताचे लघुरुप असल्याचे यावेळी कुलगुरूंनी सांगितले. या अत्याधुनिक केंद्राचा देशभरातल्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भगवान आर्सेवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. चव्हाण आणि विना भालेराव यांनी केले.
