scorecardresearch

“संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी!

संजय राऊतांनी ‘महामोर्चा’त केलेल्या विधानावरून चित्रा वाघ यांनी टोलेबाजी केली आहे.

“संजय राऊतांना दिवास्वप्न पडतात, ते…”, महामोर्चातील ‘त्या’ विधानावरून चित्रा वाघ यांची टोलेबाजी!
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केलं होतं. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिनादेखील बघणार नाही, असं विधान संजय राऊतांनी केलं. “आजच्या महाविकास आघाडीच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पदच्युत केलं आहे. राज्यपालांना पदच्युत करणारा हा विराट मोर्चा आहे. शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिनाही बघणार नाहीत, असा इशारा या मोर्चाने दिला आहे,” असं विधान राऊतांनी केलं.

हेही वाचा- VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

राऊतांच्या या विधानावरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टोलेबाजी केली आहे. “संजय राऊतांना स्वप्न पडतात, ते सर्वज्ञानी आहेत. ही सगळी दिवसा पडलेली दिवास्वप्न आहेत. शिंदे-फडणवीस सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या राज्यातील गोर-गरीब घटकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या १२५ दिवसांत २०० ते २५० निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सगळी जनता खूश आहे. हे फेसबूकवरचं सरकार नाही, हे ‘फेसवर स्माइल’ आणणारं सरकार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवरील महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास वाढला आहे,” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. त्या बारामती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- “…त्यांना शरम वाटली पाहिजे”, शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींवर हल्लाबोल!

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “शिंदे सरकारने एनडीआरएफचे निकष बदलून शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुप्पट ते तिप्पट केली. महाविकास आघाडीने स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारी पेन्शन बंद केली होती. पण विद्यमान सरकारने ही पेन्शन पुन्हा सुरू केली. असे कित्येक निर्णय या सरकारने घेतले आहेत. गोर-गरीबांपर्यंत सर्व योजना आणि सुविधा पोहोचवणारं हे सरकार आहे. त्यामुळे आपले सर्वज्ञानी संजय राऊत यांचं हे दिवास्वप्न कधीही खरं होणार नाही,” असंही वाघ म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 18:35 IST

संबंधित बातम्या