अलिबाग – शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्‍यावर टाकलेल्‍या कॅश बॉम्‍बनंतर आता शेकापच्‍या राज्‍य प्रवक्‍त्‍या चित्रलेखा पाटील यांनी नवीन कॅशबॉम्‍ब टाकला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा कॅश सोबतचा कथित व्हिडिओ आणि फोटो त्‍यांनी समोर आणून खळबळ उडवून दिली आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी व्‍हावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

दानवे यांच्‍या कॅशबॉम्‍ब प्रकरणात आता शेकापने उडी घेतली आहे. चित्रलेखा पाटील यांनी काल शेतकरी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधत हा कथित व्हिडिओ फोटो माध्‍यमांना दाखवला. सत्‍ताधारी पक्षांतील मंत्री, आमदार अशा पदधतीने पैसे जमवत आहेत. त्‍यांचे व्हिडिओ समोर आल्‍यानंतर त्‍यांची चौकशी होणे गरजेचे आहे. अंबादास दानवेनी व्हिडिओ समोर आणला, त्‍यापूर्वी निलेश राणेंनी निवडणुकीत केलेला व्हिडिओ पाहिला , मंत्री भरत गोगावले यांचाही व्हिडिओ माझ्याकडे आहे. यासारखे आमदार , खासदार जनतेच्‍या पैशाची लूट करीत आहेत. तो व्हिडिओ खरा की खोटा हे कोण ठरवणार, चौकशीची मागणी करणे गैर आहे का, असा सवाल त्‍यांनी केला. या सर्व व्हिडिओ प्रकरणाची, अशा सर्व लोकप्रतिनिधींची ईडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्‍यामार्फत चौकशी व्‍हायला हवी अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.

माध्‍यमांशी बोलताना चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्‍यावर गंभीर आरोप केले आहेत. ते सरकारी ठेक्‍यांमधून मोठया प्रमाणावर कमिशनची मागणी करतात त्‍यामुळे ठेकेदार जेरीस आले आहेत. राज्‍यात सर्वाधिक गुन्‍हे असलेले ते आमदार आहेत. अॅट्रॉसिटीपासून कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल आहेत. जे व्हिडिओमध्ये दिसतात ते जनतेचे पैसे आहेत.त्‍यामुळे या प्रकरणाची, त्‍यांच्‍या बँक खात्‍यांची चौकशी व्‍हायला हवी, असं चित्रलेखा पाटील म्‍हणाल्‍या.

शेतकरयांची कर्जमाफी सरकार करू शकत नाही, कर्मचारयांचे पगार द्यायला पैसे नाहीत मग या आमदारांकडे पैसे येतात कुठून असा सवाल त्‍यांनी केला. नगरपालिका निवडणूकीत काय झालं हे सर्वांनी पाहिलं, सर्वसामान्‍य जनता दहशतीखाली आहे. राजकारण कुठल्‍या थराला पोहोचले आहे. या सर्वांना पैशाचा आणि सत्‍तेचा माज असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला.

गोगावलेंनी आरोप फेटाळले

मंत्री भरत गोगावले यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. उभ्‍या आयुष्‍यात आपण असं काही गैर केलेले नाही. चित्रलेखा पाटील या माझ्या मुलीसारख्‍या आहेत. त्‍यांनी काय व्हिडिओ दाखवला, त्‍यांना कुणी दिला मला माहिती नाही परंतु आपल्‍याकडून असं काही होणार नाही. आम्‍ही मर्दाची अवलाद आहोत. असे व्हिडिओ वगैरे याच्‍यात आम्‍ही पडत नाही आम्‍ही समोरासमोर लढतो असं भरत गोगावले म्‍हणाले.