scorecardresearch

सोलापूर: बनावट विमा पॉलिसीतून चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीची तीन कोटींची फसवणूक

याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

insurance fraud
संबंधित वाहनधारकांसह चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीची फसवणूक झाली आहे (फोटो सौजन्य-प्रातिनिधिक छायाचित्र लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर: चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळाचा वापर करून आणि या कंपनीचे एजन्ट असल्याचे भासवून बनावट विमा पॉलिसी तयार केली आणि त्यातून कंपनीची दोन कोटी ९३ लाख ६९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हा फसवणुकीचा गोरख धंदा विजापूर रस्त्यावरील नवीन आरटीओ कार्यालयाजवळील सिध्दार्थ आॕनलाईन सर्व्हिसेस या केंद्रात मागील वर्षभर राजरोसपणे सुरू होता. यात डफरीन चौकातील चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीच्या शाखेशी संबंधित कर्मचारी प्रदीप सावंत याचाही सहभाग आढळून आला आहे. चोलामंडम जनरल इन्शुरन्स कंपनीच्या फसवणूक नियंत्रण युनिटचे सहायक सरव्यवस्थापक विनय रामकृष्ण मंत्री (रा. अहमदाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिध्दार्थ आॕनलाईन सर्व्हिसेसचा अजय कोरवार आणि प्रदीप सावंत या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- चंद्रपूर : गुजरातमधून महाराष्ट्रात प्लास्टिक तस्करी; एम.आर. ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनवर छापा, ३२०० किलो प्लास्टिक जप्त

कोरवार आणि सावंत या दोघांनी चोलामंडलम एमएस जनरल इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळाचा वापर करून या कंपनीचे एजन्ट असल्याचे भासवून मोटारवाहनधारकांना कमी किंमतीचा प्रिमियम मिळवून देण्याचे आमीष दाखविले. त्यांच्या या जाळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी विविध राज्यांतील मोटारवाहनधारक फसले. कमी किंमतीचा प्रिमियम मिळवून देण्याचे आमीष दाखविल्यानंतर कोरवार आणि सावंत यांनी तशा प्रकारचे बनावट विमा पॉलिसी तयार करून त्यांचा वापर केला. यात संबंधित वाहनधारकांसह चोलामंडलम इन्शुरन्स कंपनीची फसवणूक झाली आहे. कंपनीची दोन कोटी ९३ लाख ६८ हजार ८३६ रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या