नगर : शहरातील चौपाटय़ांवरील खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या गाडय़ा तसेच हॉटेलमधील स्वयंपाकी, वेटर व कर्मचाऱ्यांची वर्षांतून दोनदा आरोग्य तपासणी महापालिका करणार आहे. त्याचबरोबर तेथे स्वच्छ आहार, चौपाटय़ांवर स्वच्छ पाण्याचा वापर होतो की नाही याचीही तपासणी मनपा करणार आहे. महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार पावसाळय़ापूर्वीच्या साथीच्या आजारांवरील उपाययोजनांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, सदस्य संजय ढोणे तसेच मनपाच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचारी आदी उपस्थित होते.
पावसाळय़ापूर्वी डेंगू, मलेरिया आदी साथींचे आजार पसरतात. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी मनपामार्फत पावसाचे पाणी साचल्यानंतर डासाची उत्पत्ती होऊ नये, यासाठी टायरवाले, भंगारवाले, मोकळय़ा भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. घंटागाडीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. डासांचे प्रमाण कमी करणे तसेच प्रत्येक घरापर्यंत आरोग्यसुविधा देणे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा असे आवाहान करण्यात आले. तसेच दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.
मनपाचा फिरता दवाखाना बंद
केंद्र सरकारमार्फत नगर शहरात १२ आरोग्य केंद्रं सुरू केली जाणार आहेत. दर १५ हजार लोकसंख्येला एक अशा प्रमाणात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारम्ी उपलब्ध केले जाणार आहेत. याच्या नियोजनासाठी लवकरच आरोग्य समितीच्या बैठकीचे आयोजन केले जाईल. मनपाचा फिरता दवाखाना वाहन चालक नसल्यामुळे बंद आहे. शहरात फिरत्या दवाखान्यासाठी दोन वाहनांची आवश्यकता असल्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले.