जालना : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरुंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सोमवारी जालना शहरात उमटले. सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमदार पडळकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चात ख्रिश्चन समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. ॠतुजा राजगे आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, याप्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरू तसेच समाजाविरुद्ध वक्तव्ये करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
ख्रिश्चन समाजाशी संबंध नसलेल्या ॠतुजा राजगे यांच्या आत्महत्येचा संबंध जोडून आमदार पडळकर यांनी ख्रिश्चन समाजाची बदनामी केली असून, त्यांना वेळीच लगाम घालण्याची मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. पडळकर यांनी केवळ ख्रिश्चन समाजाच्या भावनाच दुखावलेल्या नाहीत तर त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजातील शांतता आणि लोकशाही मूल्यांवर आघात झाला असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
वैभव उगले, लालबहादूर कांबळे, चंद्रसेन निर्मल, डी. वाय. भालेराव, रविकांत दानम, अनिल साठे, दीपक केदार आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. खासदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल आदींची भाषणे मोर्चासमोर झाली. जालना शहर काँग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, शिवराज जाधव आदींची उपस्थिती यावेळी होती.