Churchgate Virar Local Train Woman AI VIDEO Reel : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुमच्याही नकळत तुमचे फोटो आणि व्हिडिओ काढले जाऊन त्याचे एआयच्या माध्यमातून अश्लील सामग्री तयारी केली जाते आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. असा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करून ३१ वर्षी तरुणाला अटक केली आहे.
मोहम्मद साबिर मोहम्मद रुस्तम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वसई पूर्व येथे राहणारा एक शिंपी (टेलर) आहे आणि मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठचा रहिवासी आहे. न्यूज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे दक्षिण सायबर पोलीस पथकाने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याचा ओप्पो मोबाईल फोन जप्त केला असून, त्यामध्ये अनेक महिलांचे रेकॉर्ड केलेले फोटो आणि व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे.
गुपचूप फोटो काढून इन्स्टाग्रामवर शेअर
चर्चगेट विरार फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा २२ जून २०२६ रोजी रात्री ८. वाजून ३५ मिनिटांनी काढला होता. पाच दिवसांनी तिचा हा फोटो अश्लील गाण्यासह रीलच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात. या रीलला १.११ लाखांपेक्षा जास्त व्हयुज मिळाले होते. या संबंधित तरुणीने या घटनेची माहिती मिळताच १९ ऑक्टोबर रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
आरोपीला पोलिसांनी केली अटक
तपासकर्त्यांना आढळलं की, आरोपीने महिलांचे गुपचूप रेकॉर्ड केलेले फोटो आणि व्हिडिओ अश्लील सामग्रीत बदलण्यासाठी एआयचा वापर केला आणि ते इंस्टाग्रामवर अपलोड केले. त्याने ‘प्लेबॉय’ (Playboy) नावाचं एक बनावट अकाऊंट देखील तयार केलं होतं, यासाठी त्याने एका महिलेच्या फोटोचा प्रोफाईल पिक्चर म्हणून वापर केला होता. सुरुवातीला संशयिताच्या ओळखीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बहुस्तरीय तपासाचा आधार घेत त्याचा माग काढून त्याला अटक केली.
पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
लोकल ट्रेनमध्ये, रेल्वे स्थानकांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलांचे गुपचूप चित्रीकरण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती रेल्वे पोलिसांना देण्याचे किंवा ११२ या क्रमांकावर कॉल करून कळवण्याचे आवाहन पोलिसांनी प्रवाशांना केले आहे. तसंच, नागरिकांना असे अश्लील, मॉर्फ केलेले किंवा एआय-जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ पुढे पाठवण्यापासून किंवा शेअर करण्यापासून सावध करण्यात आलं आहे. अशा प्रकारची आक्षेपार्ह सामग्री सायबर क्राईम हेल्पलाईन १९३०, राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात रिपोर्ट केली जाऊ शकते. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
