‘समृद्ध जीवन’ कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी लीना मोतेवार यांना बुधवारी रात्री उशीरा पुण्यातून अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशिराने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटकेची कारवाई करण्यात आली.  समृद्ध जीवन चिटफंडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात लीना यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप आहे.
लीना यांच्यावर फसवणुकीप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल होता. मोतेवारांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून चिटफंडप्रकरणी त्यांच्याकडील चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे लीना यांच्या अटकेची कारवाई केल्याची माहिती मिळते आहे. मोतेवार यांना अटक केल्यानंतर चिटफंडमधील अधिक तपासासाठी यापूर्वी ‘समृद्ध जीवन’च्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरसह ५८ कार्यालयांवर छापे टाकले होते. चिटफंड घोटाळ्याप्रकरणी उस्मानाबाद पोलिसांच्या अटकेत असलेला समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार यांच्यावर महाराष्ट्रासह ओरिसा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील विविध गुन्हे दाखल आहेत.