मुंबई: सिडको क्षेत्रात सध्या ३४२ दशलक्ष लीटर(एमएलडी) पाणीपुरवठा होत असून ३० दशलक्ष लीटर तूट भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करत आहोत. ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर सिडको क्षेत्रात पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सिडकोतील पाणी टंचाईच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधले. पाणी टंचाईचा प्रश्न सुटेपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर माधुरी मिसाळ म्हणाल्या की, खारघर, कामोठे, नवीन पनवेल आणि तळोजा या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. सध्या पातळगंगा, मोरबे, थेटवणे आणि बारवी या स्रोतांमधून सिडकोला ३४२ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.
सिडकोला मोरबे धरणातून सध्या ५९ दशलक्ष लीटर पाणी मिळत असून सिडकोने या धरणासाठी पूर्वी १०८ कोटी रुपयांचा खर्च केला होता. त्यामुळे या निधीच्या बदल्यात नवी मुंबईकडून सिडकोला ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करावा किंवा रक्कम परत करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
खारघर, कामोठे, नवीन पनवेल आणि तळोजा या भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा तुटवडा दूर करण्यासाठी काही तातडीचे उपाय योजना करत आहोत. मोरबे धरणात १०० दशलक्ष लीटर पाणी शिल्लक आहे. ते पाणी नवी मुंबईने डिसेंबर पर्यंत सिडकोला उपलब्ध करून देणे, जेएनपीटीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या दिले जाणारे १४ दशलक्ष लीटर पाणी सिडकोकडे वळविणे, तसेच न्हावा- शेवा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून त्यातून सिडकोला सुमारे ६९ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
तसेच विविध उपायांमुळे सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा स्थिती सुधारेल, असेही त्यांनी सांगितले.याशिवाय पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी ऑटोमेशन प्रणाली लागू करण्याचा विचार असून, सिडको करत असलेला पाणीपुरवठा पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरणासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या सर्व बाबींवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असेही मिसाळ यांनी स्पष्ट केले.
