महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे असंही सिंग यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? महाराष्ट्र करोनाच्या बाबती आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा प्रश्नही राजनाथ सिंग यांनी उपस्थित केला. भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

आम्ही करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. सहकार्य करतो आहोत. तरीही या सरकारला करोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही ही बाब दुर्दैवी आहे असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही. राजकारण समाजाच्या सेवेसाठी केली जाते. राजकारण हे स्वार्थासाठी केलं जात नाही असंही ते म्हणाले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणतात आम्ही महाराष्ट्रात सरकारमध्ये आहोत पण आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे तर संकटाच्या काळात पळ काढणं झालं. जबाबदारी झटकणं आलं. जबाबदारी झटकून टाकणं ही तर काँग्रेसची जुनी परंपरा आहे असंही ते म्हणाले.

एवढंच नाही तर सोनू सुदच्या मुद्द्यावरुनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अभिनेता सोनू सुद लोकांना चांगली मदत करतोय तर शिवसेनेला तेही बघवत नाही त्याच्यावरही टीका करण्यात आली. शिवसेनेला काय झालंय? आम्ही पाहात होतो ती बाळासाहेबांची शिवसेना हीच आहे का? असा प्रश्न आम्हाला पडतो. आमच्यासोबत शिवसेनेने विधानसभेची निवडणूक लढली त्यानंतर आम्हाला धोका दिला. आमची त्यांनी फसवणूक केली हरकत नाही, मात्र भाजपा हा पक्ष कुणाचाही विश्वासघात करु शकत नाही, असाही टोला राजनाथ सिंग यांनी लगावला.