scorecardresearch

वादळी वाऱ्याने सर्कसचे अर्ध्या तासात होत्याचे नव्हते

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाने सर्कसीचा तंबू उद्ध्वस्त झाला. गारपीट आणि वादळी पावसाने तंबूच्या आत चिखल झाला.

वादळाने उद्ध्वस्त झालेला सर्कशीचा तंबू.

सांगली : अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने ‘सुपरस्टार्स सर्कस’चे अर्ध्या तासात होत्याचे नव्हते झाले. सर्कस मालकासह सत्तर-ऐंशी कामगार, कलाकार आता कसे होणार? संध्याकाळचा खेळ तर बंदच पण पोटपूजेची काय व्यवस्था करायची या चिंतेने ग्रासले असतानाच जतकर मदतीला धावून आले. सर्कस उभी करण्यास वेळ लागणार असला तरी तोपर्यंत पोटाला कमी पडणार नाही याची जबाबदारी जतच्या नागरिकांनी घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी ताशी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहत होते. यातच वाऱ्यापाठोपाठ गारपीट करीत पाऊसही झाला. या पावसात शहरात बच्चेकंपनीचे आकर्षण ठरलेल्या सुपरस्टार्स सर्कशीचा तंबूच कोलमडून पडला. गेल्या पंधरा दिवसांपासून विजापूर मार्गावर डॉ. माळी यांच्या खुल्या भूखंडावर सर्कसीचे खेळ रंगत होते. गेली दोन वर्षे करोनामुळे मुलांना करमणुकीसाठी काहीच पर्याय नसल्याने प्राण्याविना केवळ कसरती आणि विदुषकी चाळे यावर बच्चे कंपनीच्या टाळय़ा घेत सर्कसीचे खेळ सुरू होते.

मात्र, दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक आलेल्या वादळाने सर्कसीचा तंबू उद्ध्वस्त झाला. गारपीट आणि वादळी पावसाने तंबूच्या आत चिखल झाला. होत्याचे नव्हते करण्यास  निसर्गाला अर्धा तासही भरपूर झाला.

सर्कशीचे मालक उस्मानाबादचे प्रकाश माने असून तंबूचे खांब मुळापासून उखडल्याने धाय मोकलून आक्रोश करीत होते. हे पाहून जतची जाणती मंडळी एकत्र आली. शब्दांनी केवळ धीर देण्याऐवजी पोटपूजेसाठी काही करण्यास तरुण पुढे आले. कलाकारांसह कामगारांच्या जेवणाची व्यवस्था. हनुमान जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आली. तसेच जत शहर  शिवसेनाप्रमुख विजयराजे चव्हाण, स्कीम फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रमोद दादा हिरवे, सचिन कोळी, भागवत काटकर, अल्ताफ पठाण, संदीप जेऊरकर, सचिन कोळी, अमोल कुलकर्णी, सागर कोळी, इयबाल पान शॉप, विजय दादा दुंडी, तसेच अशोक पट्टणशट्टी, शिवा माळी आदी मंडळी धावून आली. सर्कसमधल कलाकारांना धीर तर दिलाच पण मदतीसाठी पुढाकारही घेतला. शरदराव चॅरिटेबल ट्रस्ट व अभिजित दादा पतसंस्थेमार्फत रोजच्या जेवणासाठी किराणा साहित्याची तजवीज केली. वादळाने तंबूचे सुमारे पाच लाख  रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मालक माने यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Circus tent collapse by stormy wind in sangli zws