टाळेबंदीबाबत नागरिक, व्यापारी अनभिज्ञ; पोलिसांकडून निर्बंध आदेशांची कडक अंमलबजावणी

पालघर/वसई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत जारी केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरू होताच नागरिक आणि व्यापारीवर्गात गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची कल्पना नसल्याने ठिकठिकाणी  मंगळवारी सकाळी या निर्बंधांना विरोध करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त व गस्त योजून या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यावर भर दिला.

पालघर तालुक्यासह जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, वाडा ,मोखाडा या तालुक्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना व दुकाने बंद करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळपासून तालुका प्रशासनाने कठोर पावले उचलली. महसूल, पोलीस, नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने सकाळपासूनच दुकाने बंद करण्यासाठी उद्घोषणा सुरू केल्या होत्या व जी अनावश्यक दुकाने सुरू होती ती आदेशानुसार बंद करायला लावली. काही ठिकाणी प्रशासनाला दुकाने बंद करतेवेळी व्यापारी,दुकानदार वर्गाने सहकार्य केले नसले तरी नियमाची प्रभावी अंमलबजावणी करावीच लागेल असा धाक दाखवल्यानंतर या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. उपाहारगृहातून पार्सल सेवा सुरू होत्या. संपूर्ण जिल्ह्यात तालुका तहसीलदारांमार्फत कडक निर्बंधाची अंमलबजावणी सुरू केली आहे. काही ठिकाणी दुपापर्यंत दुकाने उघडी असली तरी ही दुकाने बंद करण्यासाठी प्रशासन धडपड करताना पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने काही व्यापाऱ्यांनी प्रशासनासमोर आक्रोश व्यक्त केला.

राज्यात वाढत असलेल्या करोना रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत आठवडय़ाच्या ५ दिवसात अंशत: आणि शनिवार- रविवार या दोन दिवसांत पूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, नेमके काय सुरू आणि काय बंद याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यात वसई-विरार महापालिकेने सोमवारी रात्री उशिरा नवीन नियमावली जाहीर केल्याने संभ्रम आणखी वाढला होता. पालिकेने गॅरेज, इलेक्ट्रिक दुकाने यांना परवानगी दिली आहे.  त्यामुळे मंगळवारी शहरातील दैनंदिन व्यवहार, बाजारपेठा नित्यनियमाने सुरू होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. काही भागात दुकाने सुरू आणि काही भागात दुकाने बंद असे चित्र पाहायला मिळत होते. दरम्यान दुपारी पोलिसांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली, त्यामुळे गोंधळ वाढला. पोलिसांच्या या भूमिकेमुळे व्यावारी वर्ग नाराज झाला होता आणि त्यांनी तुळींज पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. आधीच वर्षभरापासून आर्थिक संकटात सापडले व्यापारी पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पालिकेने जर निर्बध शिथिल केले नाहीत तर शहरातील व्यापारी संघटनांनी पालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  विरारमधील व्यापारी  मंगलदास धेडिया यांनी सांगितले की, मागील वर्षभरापासून व्यापारी शासनाचे नियम पाळून कर्जबाजारी झाले आहेत. आता कुठे व्यापाऱ्याला चालना मिळाली होती. त्यात  पुन्हा टाळेबंदी लागू केल्याने आत्महत्या करावी लागेल, असे ते म्हणाले.

फेरीवाले, वाहतूक मोकाट

दुकानदार, व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध असताना रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रस्त्यावरील फेरीवाल्यांचा धंदा नियमितपणे सुरू होता.  रिक्षावाले सर्रास तीन प्रवासी घेत होते.पेट्रोल पंपावर तसेच बँकांच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गर्दी दिसत होती.

नागरिकांच्या भावना रास्त आहेत. मात्र वाढत्या करोनाच्या पाश्र्वभूमीवर एप्रिलमध्ये रुग्णांचा उच्चांक गाठण्याची शक्यता लक्षात घेता निर्बंधाची प्रभावी अंमलबाजवणी होणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व स्तरातून सहकार्य करावे असे आवाहन राहील.

डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी