परभणी : जिल्ह्यातील विविध वयोगटांमधील सव्वातीन लाख नागरिक अद्यापही करोना लशीच्या दुसऱ्या मात्रेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी तातडीने लशीची दुसरी मात्रा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अंचल गोयल यांनी केले आहे. जिल्ह्यात अठरा वर्षांवरील नागरिकांमध्ये पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या १२ लाख ३० हजार ६६८ असून यापैकी दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या फक्त ९ लाख ३७ हजार ३३२ इतकीच आहे. पंधरा ते अठरा वयोगटातील पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या ६१ हजार ९४० तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांची संख्या ३३ हजार १९८ आहे. १२ ते १४ या वयोगटातील बालकांमध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २१ हजार २४८ असून यातील केवळ  १ हजार २२९ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे. 

लसीकरणाबाबत प्रशासनाने वारंवार वातावरण निर्मिती करून आणि पुरेशी खबरदारी घेऊनही अद्याप अनेक जण लसीकरणापासून दूर असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. करोना प्रतिबंधक उपाय योजनेसाठी १६ जानेवारी २०१९ पासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने विविध गटात लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. पंधरा लाख ३५ हजार २०५ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट या वेळी समोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के नागरिकांनी पहिला तर ६१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. देशात करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे वृत्त समोर येत असताना पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले आहे.