औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. महापालिका हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता औरंगाबादकरांनी किर्तन आणि तेराव्याचे जेवण ठेवत महापालिकेचा निषेध करायचे ठरवले आहे. या तेराव्यासाठी ५० हजार लोक हजर राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. कचराडेपो विरोधी जनआंदोलन समितीने ही माहिती दिली. कचरा प्रश्नावर रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई सुरुच राहिल असेही कचराडेपो विरोधी जन आंदोलन समितीने म्हटले आहे.

गेल्या १० ते ११ दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचराकोंडीवर कोणताही उपाय निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रश्नासनाने हा कचरा उचलून घनकचरा व्यवस्थापनच्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी अशी याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यावेळी न्या. एस. एस. शिंदे आणि एम एम गव्हाणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेला खडसावले.

औरंगाबाद शहरातील नागरिक सहनशील आहेत, म्हणून त्यांचा अंत पाहू नका, अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक दिवस नव्हे तर प्रत्येक तास महत्वाचा असतो. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे प्रशासनाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ही समस्या सोडविण्यास मनपा प्रशासनाला अपयश आल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

नारेगाव कचरा डेपोवर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत महापालिकेच्या मालकीच्या महापालिका हद्दीत किती मोकळ्या जागा आहेत याची माहिती मनपा प्रशासनाने खंडपीठास द्यावी, असे आदेश देत सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कचरा प्रश्नावर राहुल कुलकर्णी यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरात साथीचे रोग बळावले आहेत.