दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये जिल्हय़ात नगर तालुक्यासह नगर शहरही आघाडीवर आहे. सन २०१३च्या वर्षभरात दलितांवरील अत्याचारांचे जिल्हय़ात तब्बल १११ गुन्हे दाखल झाले आहेत. सन २०१२च्या तुलनेत ही वाढ दुपटीहून अधिक आहे. सन २०१४च्या पहिल्या चार महिन्यांतच आणखी ३० गुन्हे (६ मेपर्यंत) दाखल झाले आहेत. राज्यातील इतर जिल्हय़ांतील तुलनेत ही आकडेवारी चिंताजनक असून सोनईतील (तालुका नेवासे) तिहेरी हत्याकांडानंतरच हे प्रमाण वाढले आहे.
अनुसूचित जातिजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल होत असले तरी पोलीस अधिकारी व वकील यांच्या मतानुसार या प्रकारच्या गुन्हय़ात आरोपींना शिक्षा मिळण्याचे प्रमाण कमीच आहे. जिल्हय़ातील न्यायालयात सन १९९५ पासूनचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. न्यायालयीन सुनावणीतील दिरंगाईमुळे खटले आपापसातील तडजोडीतून मिटवले जाऊ लागले आहेत. त्यास गावपातळीवरील दबावही काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. त्यातूनच दलितांवरील अत्याचारांचे खटले जलदगती न्यायालयापुढे चालवले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका, प्रेमसंबंध, त्यातून होणारे अपहरण, बलात्कार, जुन्या भांडणातून होणारी जातिवाचक शिवीगाळ, शेतीचे वाद, वरच्या जातीतील लोकांचा धनदांडगेपणा, जातीय मानसिकता, अशी विविध कारणे दलितांवरील अत्याचारांसाठी निमित्त ठरत आहेत. ग्रामीण भागातील जत्रा, उत्सवही दलितांवरील अन्यायांना कारण ठरत असल्याचे दाखल गुन्हय़ांच्या कारणांवरून जाणवते. दलितांवरील अत्याचारास किंवा जातीय मानसिकतेस प्रतिबंध करणाऱ्या कोणत्याही स्वरूपातील दृश्य उपाययोजना जिल्हय़ात राबवल्या जाताना दिसत नाहीत.
गेल्या वर्षी जानेवारी २०१३ मध्ये सोनईत दलित युवकांचे तिहेरी हत्याकांड राज्यात गाजले. तेव्हापासून नगरमध्ये दलितांवरील वाढते अत्याचार होत असल्याची चर्चा होत आहे. खडर्य़ातील क्रूरतेने तर माणुसकीलाच काळिमा फासला. जातीय मानसिकता केवळ ग्रामीण भागातच जोपासली गेली आहे, असे नाहीतर नगर शहरातील वाढत्या घटना ही मानसिकता शहरी भागातही आपले हातपाय पसरून आहे, याकडे लक्ष वेधणारी ठरत आहे. राज्य मंत्रिमंडळात जिल्हय़ाला कायमच झुकते माप मिळाले आहे. गेली काही वर्षे जिल्हय़ाला तीन-तीन मंत्रिपदे मिळाली. त्यातील श्रीगोंद्यातील दलितांवरील अत्याचारांचे प्रमाणही नगर खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर तर संगमनेर सहाव्या क्रमांकावर आहे. वर्षांनुवर्षे मंत्रिपद भोगणाऱ्यांच्या तालुक्यातही दलितांवरील अत्याचारांच्या घटना होतच आहेत.
सन २०१२ मध्ये अनुसूचित जातिजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ४४ गुन्हे दाखल झाले होते. गेल्या वर्षी सन २०१३ मध्ये नेवाशात ८, नगर तालुका २१, नगर शहर १२, जामखेड २, श्रीगोंदे ११, पारनेर ५, राहाता ३, शेवगाव ६, श्रीरामपूर ६, राहुरी ५, कोपरगाव ३, कर्जत ८, संगमनेर ७, अकोले २, पाथर्डी ५ गुन्हे दाखल झाले आहेत.
 यात्रेच्या कावडीवरून मारहाण
जातीय मानसिकता कशी खोलवर रुजली आहे, हे पाथर्डीतील गेल्या महिन्यात घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होते. पंधरा दिवसांपूर्वी, जिरेवाडी गावात खंडोबा देवस्थानची यात्रा होती. रमेश दशरथ शिंदे या दलित समाजातील तरुणाने परंपरेनुसार, श्रद्धेने देवासाठी कावडीने पाणी आणले. परंतु गावातील वरच्या जातीतील लोकांना हे आवडले नाही. दलित युवकाने कावडीने आणलेल्या पाण्याने देवाला स्नान घालण्यास त्यांनी प्रतिबंध केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत. त्यांनी शिंदे यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.