नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत गैरव्यवहार?

नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

स्पर्धकांची संख्या वाढवल्याचा, आवश्यक परवानग्या न घेतल्याचा आरोप

पालघर : पालघरमध्ये २५ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केलेल्या पालघर नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांपेक्षा अधिक स्पर्धक दाखवण्यात आलू असून टी-शर्ट खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या गेल्या नसल्याचा आरोप होत असल्याने ही स्पर्धा प्रथमच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नगराध्यक्ष मॅरेथॉन स्पर्धेत टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार मराठा महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. २४ जून २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पालघर शहरात वर्षां मॅरेथॉन आयोजित करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. मात्र १६ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वर्षां मॅरेथॉनऐवजी नगराध्यक्ष मॅरेथॉन असे कागदोपत्री नामकरण करण्यात आले. मात्र नगराध्यक्ष मॅरेथॉन नावाने स्वतंत्र ठराव घेतला असल्याचे दिसून आले. या स्पर्धेच्या नऊ  दिवस अगोदर अभिकर्ता नियुक्तीबाबत ठराव करण्यात येऊन १९ ऑगस्ट रोजी या संदर्भात निविदा मागविण्यासाठी नोटीस काढण्यात आली. ही नोटीस वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्याऐवजी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या कामी दोन लाख रुपयांची आर्थिक तरतूद असताना ही संपूर्ण स्पर्धा अनियमित असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शिवाय या कामी प्राप्त निविदा एकाच प्रकारच्या एक्सेल शीटवर, एकाच पद्धतीने आणि एकाच हस्ताक्षरात दिली गेल्याने तसेच या निविदा लेटरहेडवर देण्याऐवजी साध्या कागदावर दिल्याने हा सर्व प्रकार संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

ही स्पर्धा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन किंवा राज्य संघाच्या अधिकृत परवानगीशिवाय घेतली गेली असल्याने या स्पर्धेमध्ये संघटनेचे पंच उपलब्ध झाले नाहीत. या स्पर्धेत अनेक चुकीच्या वयोगटातील स्पर्धा ठेवल्याचे निदर्शनास आले असून अंतिम निकालामध्ये खाडाखोड आणि बदल केल्याचे निकालपत्रावरून दिसून येते. त्याच पद्धतीने अनेक विजेत्यांच्या नावासमोर त्यांचा चेस्ट क्रमांक नसल्याचे तसेच शेकडो खेळाडूचे नाव यादीत अनेकदा टाकून किमान आठशे खेळाडूंची संख्या वाढवण्याचा प्रकार घडल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

टी-शर्टमध्ये गैरव्यवहाराचा आरोप

या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना पदक तसेच न्ह्याहारी-पाण्याची बाटली यांची व्यवस्था करण्यात आली होती. या सगळ्या व्यवस्थेची संख्या एक हजार असताना या स्पर्धेसाठी दोन हजार टी-शर्ट आणले गेले, असा सवाल करून टी-शर्ट खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे मराठा महासंघाचे म्हणणे आहे. या स्पर्धेसाठी निविदा नोटीस नगर परिषदेने १९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध केली असताना टी-शर्ट खरेदीसाठी प्राप्त निविदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत दिल्या गेल्याचे दिसून आले आहे. टी-शर्ट खरेदीसाठी ठराव होण्याआधीच पुरवठा धारकांना नगरपरिषदेच्या नावाने निविदा आल्याने आपल्या मर्जीतील काही लोकांना ठेका देण्यासाठी तसेच या प्रकरणी गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणाची पुरायासह तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे.

या वाहतुकीसाठी जिल्हा मार्केटिंग असोसिएशनची परवानगी नव्हती, त्याचप्रमाणे स्पर्धेदरम्यान वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सूचना करण्यात आली नव्हती. या स्पर्धेचे आयोजन घाईघाईत करण्यात आले होते. टी-शर्ट खरेदी आणि इतर व्यवहारामध्ये गैरप्रकार झाले आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी व वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात आली आहे. – बाबासाहेब गुंजाळ, संस्थापक अध्यक्ष, वीर मराठा महासंघ, पालघर

 

पालघरमध्ये प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  नगर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी ठराव घेऊन प्रयत्न केले होते. मॅरेथॉनच्या प्रत्यक्ष आयोजनाची जबादारी विभागप्रमुख यांची होती. करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधितांची चौकशी केली जाईल. – डॉ. उज्जवला काळे, नगराध्यक्ष

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: City presidents marathon contest abused akp