scorecardresearch

तोफखाना भागातील रस्त्याच्या कामासाठी नागरिक खड्डय़ात!

राज्य सरकारने नगरविकास खात्यामार्फत शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ३ वर्षांपूर्वी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

नगरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात गांधीगिरीने आंदोलन

नगर : राज्य सरकारने नगरविकास खात्यामार्फत शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ३ वर्षांपूर्वी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून तोफखाना भागातील प्रभाग ९ मध्ये रस्त्याचे काम ३ वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले. मात्र हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही सुरू केले नाही. हा रस्ता खड्डेमय होऊनही विभाग त्याची दखल घेत नसल्याने नगरसेवक व नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने खड्डय़ात बसून बांधकाम विभागाचा निषेध केला तसेच रस्त्याचे काम होण्यासाठी रोज आंदोलन करण्याचा इशारा दिला.

नगरसेविका तथा माजी उपमहापौर मालन ढोणे, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्यासह कल्पेश परदेशी, ऋषिकेश गुंडला, डॉ. प्रशांत सुरूकुटला, शामराव रोकडे, विशाल वाघमारे, संजय बोरा, मधुकर सावडेकर, प्रकाश दुस्सा, दिलीप गरके, विनोद राच्चा, रमेश कदम, वैभव सावडेकर, सागर सावडेकर, सचिन दीवाने, राहुल मुथ्था, खंडू उदगीरकर आधी आंदोलनात सहभागी होते. शहरातील तोफखाना भागाचे आंदोलन करण्यात आले.  यासंदर्भात माजी नगरसेवक जाधव यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यासाठी पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लवकरच पावसाळा सुरू होईल, त्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. रस्त्याचे काम सन २०१९ मध्ये मंजूर असून संबंधित ठेकेदाराला विभागाने कार्यारंभ आदेशही दिला आहे. परंतु ठेकेदार काम करत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याचे काम पूर्ण करत नाही तोपर्यंत नागरिक रोज रस्त्यावरील खड्डय़ात बसून आपले कामकाज करतील. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेने बांधकाम विभागाला ना हरकत दाखला दिला आहे, परंतु आता तीन वर्षांच्या काळात डांबराचे भाव तीनपट वाढल्याने ठेकेदार काम करायला तयार नाही. यासंदर्भात बांधकाम विभागाने उद्या, मंगळवारी बैठक आयोजित केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Civil potholes road work public works department ysh

ताज्या बातम्या