Abhijit Dipke on Shivaji Park Protest Case: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. “आणखी गुन्हे दाखल करा, तरीही लोकशाही वाचवण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील,” असा ठाम निर्धार दिपके यांनी व्यक्त केला आहे. दिपके यांनी शनिवारी ‘एक्स’वर पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली. २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या आंदोलनानंतर स्थानिक रहिवासी आणि वकील सिद्धी देवळेकर यांनी शुक्रवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावर दिपके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारलेली असतानाही दिपके यांच्यासह सीजेपीचे आशुतोष रांका, सौरव दास, पक्षाच्या विधी विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह आणि इतरांनी बेकायदेशीरपणे गर्दी जमवून आंदोलन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. देवळेकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने शुक्रवारी शिवाजी पार्क येथे हे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात तरुणांसह ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अभिनेत्री शबाना आझमी, चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह अनेक कलाकार, सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

abhijeet dipke tweet
सिद्धी देवळेकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर अभिजीत दिपके यांनी भाष्य केले.

पोलिसांनी ध्वनीप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत या सभेला परवानगी नाकारली होती. मात्र प्रशासनाच्या बंदीला न जुमानता हजारो तरुण शिवाजी पार्कवर दाखल झाले. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिपके यांनी घटनास्थळीच ‘जेल भरो आंदोलना’ची हाक दिली.

“ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा देऊन फौजदारी कारवाईला सामोरे जावे,” अशी मागणी सीजेपीचे महाराष्ट्रातील नेते अजिंक्य शिंदे यांनी यावेळी केली. तसेच २०२५ ची मतदार यादी स्थगित करण्यात यावी आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचा २०२३ चा नवा कायदा रद्द करण्यात यावा, अशा मागण्याही त्यांनी उपस्थित केल्या.

१० ऑक्टोबरला दिल्लीत ‘जंतरमंतर २.०’ आंदोलनाचा इशारा

शिवाजी पार्क येथील यशस्वी शक्तिप्रदर्शनानंतर दिपके यांनी केंद्र सरकारला थेट इशारा देत आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली आहे. “ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरातून नागरिक दिल्लीकडे कूच करतील आणि १० ऑक्टोबर रोजी जंतर-मंतरवर आंदोलन केले जाईल,” अशी घोषणा त्यांनी केली. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय मार्गाने होईल, असे स्पष्ट करत देशात निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या ‘जंतरमंतर २.०’ आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.

तक्रारदार काय म्हणाले?

दरम्यान शिवाजी पार्कवरील स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार सिद्धी देवळेकर यांनी एएनआय वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, मी गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्कच्या अगदी समोर राहते. माझा कोणाच्याही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराला विरोध नाही. प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा हक्क आहे, पण त्यासाठी सरकारने जागा ठरवून दिल्या आहेत. निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करायची असेल, तर आझाद मैदान किंवा दिल्लीतील जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे. लोकांच्या घरांसमोर रस्ते अडवून आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे?