राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत लवकरच मुंबईत ‘जेन-झी’ (Gen Z) आणि ‘जेन-अल्फा’ (Gen Alpha) पिढीतील तरुण व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रस्तावित कार्यक्रमावर आता राजकीय व सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या उपक्रमावर प्रतिक्रिया देताना, “ज्येष्ठांनी तरुणांशी संवाद साधणे चांगलेच आहे; पण हा संवाद तरुणांनीच आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून त्यांना करायला भाग पाडला आहे,” असे म्हटले आहे.
“वयस्कर नेत्यांपेक्षा तरुण प्रतिनिधींशीच संवाद व्हावा”
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजित दिपके म्हणाले, “चर्चा किंवा संवाद सुरू होणे ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, ७० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांशी संवाद साधण्यापेक्षा, तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी तरुण चेहरेच समोर आणले तर ते अधिक फलदायी ठरेल. ‘जेन-झी’ पिढीला त्यांच्याच वयाचे आणि विचारांचे प्रतिनिधित्व हवे आहे. तरुणांनी तरुणांशीच संवाद साधला तर त्याचा खरा फायदा होईल.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, देशातील सत्ताधारी व ज्येष्ठ नेत्यांना आता नव्या पिढीकडे (Gen Z) दुर्लक्ष करून चालणार नाही हे उशीराने का होईना कळून चुकले आहे. “आजच्या तरुणाईला टाळणे आता कोणालाही शक्य राहिलेले नाही. हा देश तरुणांचा आहे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे,” असेही दिपके यांनी नमूद केले.
NEET आंदोलन आणि सोशल मीडियावरील बदल
नवी दिल्लीतील ‘NEET’ पेपरफुटी प्रकरणावरून ‘सीजेपी’ आणि देशभरातील तरुण व्हॉट्सॲप व सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले होते. जंतर-मंतरवर झालेल्या तीव्र आंदोलनांनंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याचा उल्लेख करत दिपके म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर रील-शैलीतील व्हिडिओ पोस्ट करणे असो वा मोहन भागवत यांचा तरुण विद्यार्थ्यांशी संवाद असो; या सगळ्या गोष्टी तरुणांनी निर्माण केलेल्या दबावामुळेच घडत आहेत. हा तरुणांच्या ताकदीचा विजय आहे.”
मुंबईत रंगणार २,००० विद्यार्थ्यांचा महाकुंभ
‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’ (IIMUN) च्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्थान: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC), मुंबई.
सहभाग: देशभरातील १०० हून अधिक शहरांमधील १५ ते १९ वयोगटातील सुमारे २,००० हून अधिक विद्यार्थी.
थीम: ‘द रोल ऑफ यूथ इन युनायटिंग द वर्ल्ड, द इंडियन वे’ (भारतीय पद्धतीने जगाला जोडण्यात तरुणांची भूमिका).
या परिषदेत स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर तरुण विद्यार्थी आपापली मते मांडणार असून, त्यावर सखोल चर्चा व वादविवाद रंगणार आहेत.
