मुंबई : ‘‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह तीन मागण्यांवर अजिबात समझोता केला जाणार नाही. या मागण्यांसाठी शनिवारी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर आयोजित करण्यात आलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील नागरिकांच्या विरोधात जणू काही युद्ध पुकारल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट आहे,’’ अशी खरमरीत टीका कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात केली. पोलिसांनी कितीही आडकाठी आणली तरी आंदोलन होणारच हे त्यांनी स्पष्ट केले.

जंतर-मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी नवी दिल्लीची तटबंदी करण्यात आली आहे. हे आंदोलन होऊ नये या दृष्टीने सारे प्रयत्न सुरू आहेत. बंगळूरुमधील आंदोलन आटोपून मुंबईत आलेल्या दिपके यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात शनिवारचे आंदोलन, सीजेपीची पुढील वाटचाल, शाळा सुधारण्यासाठी करण्यात येणारे आंदोलन यांवर सविस्तर भाष्य केले.

जंतर-मंतरवरील आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार एवढी टोकाची भूमिका का घेत आहे हेच समजत नाही. केंद्र सरकारला देशातील लोकांची भीती वाटत असावी. यामुळेच हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दिल्ली पोलीस, जम्मू आणि काश्मीरमधील पोलीस, निमलष्करी दल यांना पाचारण करण्यात आले आहे. लोक नाराज असल्यानेच सरकारच्या विरोधात असंतोष वाढला आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने खरे तर पावले उचलणे अपेक्षित होते. पण रेल्वे, मेट्रो बंद करून लोकांच्या अडचणीत भर घालत आहे. रस्ते, रेल्वे, मेट्रो बंद केल्याने लोक अधिक चिडतील. आणीबाणीत किमान रेल्वे गाड्या वेळेत धावत होत्या. स्वातंत्र्यानंतर लोकांच्या आंदोलनाच्या भीतीने रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला. आणिबाणीच्या काळातही अशी परिस्थिती नव्हती याकडे दिपके यांनी लक्ष वेधले. लोकांची एवढी भीती वाटते तर त्यांच्या नाराजीचे मूळ शोधून त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करायला हवे होते. पण तसे काही होत नाही, अशी खंत दिपके यांनी व्यक्त केली.

अभिजीत दिपके (Express Photo by Ganesh Shirsekar)

शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी नाकारताना लोकांना त्रास होईल, असे कारण देण्यात आले होते. पण दिल्लीतील रस्ते, मेट्रो, रेल्वे बंद केल्याने लोकांना त्रास होणार नाही का, असा सवाल दिपके यांनी केला. नागरिकांच्या अधिकाराचा आदर करण्याऐवजी सरकार स्वत:च्याच नागरिकांना शत्रूराष्ट्रातील नागरिकांप्रमाणे वागणूक देत आहे. ‘सरकारला स्वत:च्याच नागरिकांची भीती वाटत आहे. नागरिकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकारने परिस्थिती हाताळण्याची भूमिका बदलायला हवी,’ असे मत दिपके यांनी व्यक्त केले.

न्यासाची नोंदणीही रखडली

निधीचा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. यामुळेच न्यास म्हणून दिल्लीत नोंदणीसाठी अर्ज केला आहे. मात्र नोंदणीची प्रक्रिया अद्यापही रखडली आहे. ही नोंदणी का रखडली हे समजले नाही, असेही दिपके यांनी सांगितले.

हे सरकार अधिकच पाशवी

जनआंदोलने हाताळण्याची केंद्र सरकारची पद्धती दडपशाहीची असल्याचे सांगताना दिपके म्हणाले, या देशात २०११ सालीही आंदोलन झाले होते. पण, २० जुलैला ज्याप्रमाणे आंदोलनकर्त्यांना, लहान मुलांना मारहाण झाली तशी तेव्हा कधी झाली नाही. या आधीची सरकारे फार चांगली होती, असे म्हणणार नाही. पण, ती इतकी पाशवी नव्हती. या आंदोलनात १५ वर्षांच्या मुलींना मारहाण झाली आहे. माझ्या समोर एका पुरूष पोलिस अधिकार्‍याने एका १२ वर्षाच्या मुलीचा गळा पकडून कानशीलात मारली. सध्या सुरू असलेल्या आंदोलनातही एका पोलिस अधिकार्‍यानेच एका मुलीचा विनयभंग केला. परंतु, या अधिकार्‍याला दुसर्‍या दिवशी बढती दिली गेली, अशा शब्दांत त्यांनी या घटनेविषयी विषाद व्यक्त केला.

‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात अभिजीत दिपके (Express Photo by Ganesh Shirsekar)

तीन मागण्यांवर ठाम

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रिया रद्द करून २०२५च्या मतदारयाद्या ग्राह्य मानल्या जाव्यात आणि मुख्य निवडणूक आयुक्त तसेच आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणावी या तीन मुख्य मागण्या आहेत. या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत, असेही दिपके यांनी स्पष्ट केले.
(सविस्तर वृत्तांत रविवारच्या अंकात)