केंद्रीय निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद असल्याची माहिती समोर आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी विरोध डावलून अनेक निर्णय घेतल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्याच इतर दोन आयुक्तांनी केल्याचं वृत्त समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवरच विरोधी पक्षांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. या आंदोलनाची सुरूवात २ ऑक्टोबरपासून मुंबईतून करण्यात येणार आहे. मात्र, ‘सीजेपी’च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, त्यामुळे हे आंदोलन होणार की नाही? असा संभ्रम निर्माण झाला होता.

तसेच ‘सीजेपी’च्या विविध शहरांमधील आंदोलनांच्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आता हा गोंधळ दूर करण्यासाठी ‘सीजेपी’चे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुंबईतील आंदोलनाबाबत महत्वाची माहिती सांगितली आहे.

मुंबईतील आंदोलनाबाबत रांका यांनी काय सांगितलं?

सीजेपीने बुधवारी स्पष्ट केलं की, २ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेलं त्यांचं आंदोलन फक्त मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणीच होईल. सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर आशुतोष रांका यांनी पोस्ट शेअर करत सांगितलं की, “सीजेपीबाबत फिरणाऱ्या अनेक संदेशांच्या संदर्भात हे स्पष्टीकरण आहे. कृपया नोंद घ्या की, कॉक्रोच जनता पार्टीचं २ ऑक्टोबरचं आंदोलन फक्त मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेलं आहे. आम्ही आगामी काळात इतर शहरांमध्येही आंदोलन करणार आहोत. त्याबाबतची माहिती लवकरच दिली जाईल”, असं स्पष्टीकरण आशुतोष रांका यांनी दिलं.

दिपकेंनी विरोधकांना काय आवाहन केलं होतं?

अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांना उद्देशून केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “निवडणुकांमध्ये फेरफार होत आहेत, अशा फेरफार झालेल्या निवडणुकांमध्ये तुम्ही असंच सहभागी होत राहिला, तर तुम्ही त्या निवडणुकांना कायदेशीर मान्यता देता आणि त्या निष्पक्ष असल्याचा आभास टिकवून ठेवण्यास मदत करता. कदाचित तुम्ही प्रत्येक निवडणूक लढवता कारण तुम्हाला भीती वाटते की तसं न केल्यास तुमचं अस्तित्वच संपेल. या भीतीपोटी तुम्ही कदाचित निवडणुका लढवत राहाल. पण मते चोरली जात असताना, तुमचे आमदार, खासदार, पक्ष फोडले जात असताना तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारचं अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहात?”, असा सवाल दिपके यांनी विरोधकांना केला.

“तुमच्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा विचार करण्यापूर्वी देशाचा आणि लोकशाहीचा विचार करा. ठाम भूमिका घ्या आणि फेरफार होणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभागी होणं थांबवा. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा विचार करण्याआधी देशाचा आणि येथील लोकशाहीचा विचार करा”, असं आवाहन अभिजीत दिपके यांनी विरोधकांना केलेलं आहे.