मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात २ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ला मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पोलिसांच्या या निर्णयानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, “नागरिकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा देत गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईत थेट ‘जेल भरो आंदोलन’ करण्याची घोषणा केली आहे.
“एकनाथ शिंदेंना परवानगी, मग आम्हाला का नाही?” दिपके यांचा सवाल
अभिजीत दिपके यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली आहे. मुंबई पोलिसांनी या नकारामागे स्पष्टीकरण देताना नमूद केले की, शिवाजी पार्क येथे कोणत्याही सभा किंवा आंदोलनासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलिसांकडे नाहीत. अर्जदार अजिंक्य शिंदे यांना याबाबत पूर्वकल्पना देण्यात आली असून मुंबईत इतर पर्यायी जागा शोधून रीतसर परवानगी मागण्याचा सल्ला देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मात्र, पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर उत्तर देताना दिपके यांनी थेट राजकीय सवाल उपस्थित केला. “जर आम्हाला नियमांचे कारण दाखवून परवानगी नाकारली जात असेल, तर मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांना शिवाजी पार्कात परवानगी कशी मिळते?” असा रोखठोक सवाल अभिजीत दिपके यांनी केला आहे.
नेमका विवाद काय? काय आहेत निवडणूक आयोगावरील आरोप?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या एका बातमीनुसार, निवडणूक आयोगाच्या अंतर्गत कामकाजात आणि निर्णयांमध्ये आयुक्तांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या अहवालानंतर CJP ने आक्रमक होत ज्ञानेश कुमार यांनी २६ सप्टेंबरपर्यंत राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचे औचित्य साधून देशभरात आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईतून या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात होणार होती.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणासह (SIR) सर्व महत्त्वाचे निर्णय संपूर्ण आयोगाने एकमुखाने आणि सर्वसंमतीने घेतले आहेत,” असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
संस्थेच्या अंतर्गत विचारमंथनात विविध मते किंवा दृष्टिकोन असणे ही एक स्वाभाविक आणि लोकशाही प्रक्रिया आहे. आयोगाच्या सर्व आदेशांना कायदेशीर मान्यता असून सर्व वैधानिक प्रक्रियांचे काटेकोर पालन केले गेले आहे, असेही स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.
दुसरीकडे, “देशाची लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे,” असे आवाहन करत अभिजीत दिपके यांनी आपला लढा अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या या भूमिकेमुळे २ ऑक्टोबरला मुंबईत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
