scorecardresearch

शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; मिरवणुकीतील वादाचं रुपांतर हाणामारीत, सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप!

प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप आहे.

शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; मिरवणुकीतील वादाचं रुपांतर हाणामारीत, सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप!
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर

शिवसेना आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर आज मध्यरात्री दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. वादावादीचं रुपांतर हाणामारीत झाले. दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांनी मात्र आपल्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा- “धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लीम…” कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून मिटकरींचं नवनीत राणांवर टीकास्र

गणपती विसर्जन मिरवणुकीत नेमकं काय झालं?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटानेदेखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली होती. हे दोन्ही गट आमने-सामने भिडल्यामुळे परिसरात काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.

हेही वाचा- “तुम्ही काळजी करू नका” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावरून चंद्रकात पाटलांचा टोला

शिवसेना आमदार सुनील शिंदेंचा आरोप

सत्तेचा माज या लोकांना आला आहे. सत्तेमुळे ही मंडळी किती उन्मत्त झाली आहेत हे सगळं या दोन दिवसांत दिसतंय. शिवसैनिक म्हणून हे सगळं आम्ही किती सहन करायचं? आमच्या विभाग प्रमुखांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या