विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारणच नेहमी चर्चेत असते. नुकतीच झालेली किसन वीर साखर कारखाना निवडणूक आणि एका राजकीय कार्यक्रमातून हे जिल्ह्यातील गटबाजीचे राजकारण पुन्हा एकदा उफाळून आले आहे. यातून कधीकाळी जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु २०१९ च्या राज्यातील घाऊक राजकीय पक्षांतरामध्ये या जिल्ह्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, अतुल भोसले, मदन भोसले आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरानंतर सातारा जिल्ह्यात  भाजप राष्ट्रवादीचा प्रबळ विरोधक ठरला. मात्र साताऱ्याचे राजकारण हे कायम पक्षापेक्षाही गटबाजीभोवती फिरत असल्याने त्याचा प्रत्यय २०१९ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत आला. याचेच दर्शन पुन्हा एकदा किसन वीर साखर कारखाना निवडणूक आणि एका कार्यक्रमातून दिसून आले.

मदन भोसले यांना धक्का

किसन वीर साखर कारखान्यावर पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी आणि सध्या भाजपमध्ये दाखल झालेल्या मदन भोसले यांची सलग १९ वर्षे सत्ता होती. त्यांच्या या काळातच कारखान्याने विस्तार, साखर उद्योगातील विविध प्रयोग, उपपदार्थ निर्मिती, अन्य कारखाने चालवण्यास घेणे आदींतून मोठी भरारी घेतली. परंतु याच वाढत्या पसाऱ्याने कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळत गेली. दुसरीकडे राज्यात घडलेल्या सत्ताबदलांनंतर कारखान्याची आर्थिक कोंडीही झाली. अखेर भोसले यांना या निवडणुकीत सत्ता गमवावी लागली. वाई-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली.  ही निवडणूक जरी वरवर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी दिसत असली तरी प्रत्यक्षात पडद्यामागे घडलेल्या हालचाली मात्र राजकीय गट-तट विचारात घेत झालेल्या आहेत. या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील वाई, सातारा, खंडाळा, जावली, कोरेगाव, महाबळेश्वर या सहा तालुक्यांत पसरलेले आहे. यामुळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका देखील या निवडणुकीत महत्त्वाची होती. गेल्या काही दिवसांमध्ये याच भागात राजकीय कार्यक्षेत्र असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे या लोकप्रतिनिधींनी देखील उघड किंवा छुप्या पद्धतीने निवडणुकीत सहभाग घेतला. यात शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना मदत करत भविष्यातील त्यांच्याविरोधातील लढाई संपुष्टात आणली. दुसरीकडे या मदतीमधून गेले काही दिवस सुरू असलेला आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध साताऱ्यातील राजे गट यांच्यातील संघर्षांला आमदार मकरंद पाटील यांच्याकडून मिळू पाहात असलेले बळ शांत करण्यातही ते एकप्रकारे यशस्वी झाले. निकालानंतर मकरंद पाटील यांनी सर्वप्रथम भाजपच्या  या दोन्ही राजांचे मानलेल्या आभारातूनच या ‘बेरजेच्या राजकारणा’ची पावले उघड होतात. जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे विरुद्ध राजे गट हा संघर्ष जुना आहे. कधीकाळी जिल्ह्याचे नेतृत्व करत असलेल्या शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. आपल्या राजकीय प्रवासात अडथळा ठरू शकणाऱ्या शिंदे यांच्याविरुद्ध पक्षाच्या पलीकडे जात अनेक गट-तट एकत्र आल्याचे ते पहिले दर्शन होते. यातच पुढे सहजशक्य असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीतही या विरोधी गटाने शिंदे यांचा धक्कादायक पराभव घडवून आणला. या सर्व घटनांमधून शिंदे विरुद्ध राजे गट त्यातही शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत गेला.