सावंतवाडी : राज्य शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून, आजपासून (२१ मे २०२५) ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, प्रवेशासाठी असलेले पोर्टल बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अकरावीत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना, पोर्टल बंद असल्याने त्यांना हिरमुसलेपणाचा सामना करावा लागत आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळलेल्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी प्रवेश प्रक्रियेतच घालवावी लागेल असे चित्र निर्माण झाले आहे.
या संदर्भात, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांनी शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार, विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी २८ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. शिक्षण संचालनालयाने म्हटले आहे की, प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. मोबाइलद्वारे पोर्टल अधिक सुलभपणे हाताळता यावे यासाठी काही काळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. साइट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीसाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप चॅनेलवर लगेच माहिती दिली जाईल, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्यातर्फे https://whatsapp.com/channel/0029VbB2T6DBA1etTOdyi10C हे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू करण्यात आले आहे, असे शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.या चॅनेलवर सर्व अद्ययावत माहिती दिली जाईल, असे शिक्षण संचालनालय, पुणे यांनी म्हटले आहे.