…तर महाबळेश्वर असेल जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण

महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे.

mahabaleshwar will be most rainy place in world
भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते.

महाराष्ट्राला सातत्याने या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते आहे, याची इशाराघंटा २००७ मध्येच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालात वाजलेली होती. मात्र आपण गेली १४ वर्षे सातत्याने दुर्लक्ष करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रेमंड दुराईस्वामी गेली काही वर्षे सातत्याने याकडे लक्ष वेधत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जर या अहवालाप्रमाणे वातावरण बदल झाले तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल.

आयपीसीसीच्या अहवालात पावसाच्या असमान वितरणाकडे नेमके लक्ष २००७ सालीच वेधण्यात आले होते. हा अहवाल खरेतर २०५० साली नेमकी काय अवस्था असेल याकडे लक्ष वेधण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये देण्यात आलेले इशारे गेल्या १० वर्षांमध्येच प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झालेली दिसते, असे सांगून डॉ. दुराईस्वामी सांगतात,  त्यासाठी तापमानातील विविध बदल- अनियमितता आणि इतर निकषांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यातील तापमान वाढ तसेच पावसाचे असमान वितरण, त्याच्या वाढणाऱ्या तीव्रता आणि न पडण्याचे वाढते प्रमाण याचे नकाशेच तयार करण्यात आले असून ते जगभर सादर झाले आहेत. यात नवे काहीही नाही. उत्तर ध्रुवावरील तापमानवाढीमुळे बर्फाचे वितळणे ही सर्वात मोठी घटना असणार आहे.

नक्की वाचा >> Chiplun Floods Video: तिसऱ्या मजल्यावरून पुराच्या पाण्यात पडलेली ती व्यक्ती कोण?, तिचं पुढे काय झालं?; जाणून घ्या

महाबळेश्वर जगातील सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण

भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून  येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.

डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी आवश्यक…

भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे.  आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कॅलिफोर्निया ते कोकण… जगभरातील १० देशांमध्ये पुरांचे थैमान; Climate Change कडे दुर्लक्ष केल्याची फळं?

धोरणात्मक बदल आवश्यक….

महाबळेश्वरला तर ५९२ मिमी पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. २४ तासांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो, त्या वेळेस आपल्याला धोरणात्मक बदल करावा लागणार आहे, हे निश्चित.  एक काळ असा होता की, टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अतिशय यशस्वीरीत्या राबविली. त्याचे चांगले फायदेही महाराष्ट्राने अनुभवले. मात्र आता जागतिक वातावरण बदलाला सामोरे जाताना जिथे मोठय़ा प्रमाणावर पावसात वाढ झाली आहे, तिथे तरी वेगळी उपाययोजना करावी लागेल. तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा चालणार नाही.  त्यासाठी वेगळ्या उपाययोजनेसाठी आपण वेळीच प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दुराईस्वामी सांगतात.

काही ठिकाणी अतितीव्र पाऊस होणार….

जागतिक वातावरण बदलाचा आपल्याकडील परिणाम म्हणजे दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये काही ठिकाणी तुफान पावसाला सामोरे जावे लागेल. मात्र असमान वितरणामुळे हा तुफान पाऊस सर्वत्र होणार नाही. तर काही ठिकाणी तो अतितीव्र कोसळेल. भारत, थायलंड आणि चीनचा काही परिसर या अतितीव्र तडाख्यात असणार आहे. त्याबद्दल डॉ. दुराईस्वामी सांगतात, आपल्याकडे घाटमाथ्यावरच्या पावसामध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होणार आहे, असे आयपीसीसीच्या अहवालामध्ये २००७ सालीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात पावसानंतरच्या पूरसदृश्य स्थितीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अहवालामध्ये अजून काय म्हटलं आहे…

प्रचंड बर्फ वर्षांव होणाऱ्या सायबेरियासारख्या ठिकाणी पाऊस सुरू होईल, असे या अहवालात म्हटले आहे, त्याचा अनुभव गेली काही वर्षे येतोच आहे. त्यात कॅलिफोर्निया व कॅनडातील तापमानवाढीचेही संकेत आहेत. यंदा कॅलिफोर्नियामध्ये ५३ अंश तापमानाची नोंद झाली. ही तापमानातील मोठीच वाढ आहे. याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. जंगले खाक होत आहेत. परिणामी त्यातूनही पुन्हा तापमानवाढ होणार असून परिणामांचे हे दुष्टचक्र असेच सुरू राहील. त्यात मानवच काही ठोस पावले उचलून हे दुष्टचक्र थांबवू शकतो. हा जागतिक वातावरणातील बदल आहे. उष्णता वाढल्याने परिणामी एका बाजूस पावसाचे प्रमाणही वाढणार आहे. मात्र ते सर्वत्र वाढणार नाही तर काही ठिकाणी ते अतितीव्र वाढेल तर काही ठिकाणी पाऊस गायबच होऊन दुष्काळसदृश परिस्थितीत वाढ होणार आहे. याला पावसाचे असमान वितरण कारणीभूत असेल. आकडेवारीमध्ये दिसायला त्याने सरासरी गाठलेली असेल किंवा सरासरीपेक्षा अधिक बरसणे असेल मात्र त्याच्या असमान वितरणामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ असा सामना करावा लागेल.

(टीप – या बातमीमधील माहिती ‘लोकप्रभा’मधील महापूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना, १४ वर्षांचे दुर्लक्षच भोवले! या लेखामधून घेण्यात आली आहे. संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Climate change maharashtra floods mahabaleshwar will be most rainy place in world scsg