मुंबई/ पुणे/ ठाणे/ औरंगाबाद/ नाशिक/ नगर/ कराड/ सोलापूर / अमरावती / पालघर/ अलिबाग : दमदार पावसाअभावी राज्याच्या सर्वच विभागांतील धरणे तळ गाठू लागल्याने पाणीचिंता वाढली असून पाऊस असाच दडी मारून बसला तर पाणीप्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. सध्या धरणांतील जलसाठा २१ टक्क्यांपर्यंत घसरल्याने पाणीपुरवठा यंत्रणांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. 

पावसाच्या हंगामाच्या पहिल्या महिन्यात पाणीसाठा वाढण्याऐवजी झपाटय़ाने कमी होत आहे. १ जूनला राज्यातील सर्व धरणांत मिळून २६ टक्के पाणीसाठा होता, तो सध्या २१ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो पाच टक्क्यांनी कमी आहे. पाणीसंकट गडद होत असल्याने विविध शहरांमध्ये पाणीकपात लागू करण्यात आली आहे. काही भागांना तीन ते चार दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?

पूर्वमोसमी पावसाने यंदा राज्याकडे पाठ फिरवली, परंतु आता मोसमी पावसानेही दडी मारली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. ठाणे, भिवंडी भागांतही पाणीकपात होणार आहे. जळगाव, मनमाडला दोन दिवसांतून एकदा पाणी पुरवण्यात येत आहे. नाशिक, पुण्यावर पाणीकपातीचे संकट आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद महापालिकेसह २७ तालुक्यांमध्ये तीन ते साडेतीन दिवसांनी एकदा पाणी येते. पश्चिम महाराष्ट्रातही जलसाठा झपाटय़ाने कमी होत असल्याने अनेक भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. विदर्भातील पाणीस्थिती मात्र इतरांच्या तुलनेत काही प्रमाणात चांगली आहे.

मुंबईची धरणे आटू लागली

मुंबईची पाण्याची गरज भागविणाऱ्या तुळशी, विहार, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांतील जलसाठा घटत आहे. मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा पाऊस नसल्याने पाणीसंकट घोंघावत आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईसह ठाणे, भिवंडीतही १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. जलाशयांतील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरवण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. त्याच वेळी ऊध्र्व वैतरणातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला आहे. उर्वरित राखीव साठा वापरण्याची वेळ आली तर त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. पावसाने अशीच दडी मारली तर बांधकामाचे, कारखाने आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा थांबण्याचीही वेळ येऊ शकते.

ठाणे जिल्ह्यावर कपातीची टांगती तलवार

ठाणे जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा जेमतेम ३२ टक्के पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात ३१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख शहरांवर पाणी टंचाईचे संकट कायम असून काही शहरांमध्ये तर नियमित ‘शट डाऊन’च्या नावाखाली अघोषित पाणी कपातही सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि ग्रामीण भाग तसेच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर आंध्र धरणातून आणि भिवपुरी विद्युत प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी राखली जाते. मात्र कमी पावसामुळे सध्याच्या घडीला जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. बारवी धरणाची पाणी क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्याच्या घडीला बारवी धरणात १०७.७९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या हे प्रमाण अवघे ३१.३६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षांत हाच पाणीसाठा ३८.८८ टक्के इतका म्हणजे १३१.७३ दशलक्ष घनमीटर इतका होता. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही तर जिल्ह्यावर पाणी संकटाची शक्यता आहे. येत्या ३० जून रोजी जलसंपदा विभाग संबंधित विभागांबरोबर जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेतील. तोपर्यंत पाऊस झाला नाही आणि जलस्रोतांतील पाण्याची पातळी खालावणे सुरूच राहिले तर पाणी कपातीचे संकट अटळ आहे.

उत्तर महाराष्ट्रात टंचाईचे चटके

उत्तर महाराष्ट्रात धुळय़ाचा अपवाद वगळता नाशिक, जळगाव, नंदुरबार या तीनही जिल्ह्यांतील धरणसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. दमदार पाऊस न झाल्याने नाशिक, जळगावपुढे पाणी कपातीचे संकट आहे. धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये सर्वत्र टंचाईचे चटके बसू लागले आहेत. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या १५ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ २३ टक्के जलसाठा आहे. तिसगाव, केळझर, माणिकपूंज ही धरणे कोरडीठाक पडली असून इतर सहा धरणांचीही वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. जूनअखेपर्यंत गंगापूर धरणात अपेक्षित जलसाठा झालेला नसल्याने नाशिक शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मनमाड शहरात १५ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. इतरत्र कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. ऐन पावसाळय़ात १२ तालुक्यांतील ८४ गावे आणि ८३ वाडय़ांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात १२ धरणे कोरडीठाक

पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील एकूण २६ धरणांपैकी नऊ धरणांमध्ये एक अब्ज घनफुटापेक्षा (टीएमसी) कमी पाणीसाठा आहे, तर १२ धरणांमधील पाणीसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून केवळ नऊ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी २७ जूनपर्यंत या चार धरणांमध्ये २८.९० टक्के पाणीसाठा होता. पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित धरणांपैकी पिंपळगाव जोगे, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, वडीवळे, कासारसाई, मुळशी, टेमघर, नाझरे आणि उजनी या धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे.

कोयनेतून वीजनिर्मितीला मर्यादा

कोयना शिवसागरचा जलसाठा सोमवारी १३.६० टीएमसी (१३ टक्के) होता. मागणीनुसार जलविद्युतनिर्मिती सुरूच आहे. या पाणीसाठय़ावर १० जुलैपर्यंत वीजनिर्मिती सुरू ठेवणे शक्य आहे, परंतु दमदार पाऊस होऊन जलाशयात पाण्याची आवक न झाल्यास वीजनिर्मितीवर मर्यादा येतील, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पोतदार यांनी दिली. कोयना शिवसागराचा सध्याचा जलसाठा चिंताजनकच असून, गतवर्षी ४२.३७ टीएमसी (४०.२५ टक्के) राहिला होता.

सांगली जिल्ह्यातील वारणा-चंदोली धरणाचा जलसाठा १०.२३ टीएमसी (३० टक्के) असून, गतवर्षी या धरणात १८.८३ (५५.३८ टक्के) पाणीसाठा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा पाणीसाठा २.३७ टीएमसी (२८ टक्के) असून, त्यातून ८०० क्युसेक पाणी वीजनिर्मितीसाठी वापरात येत आहे. गतवर्षी हाच पाणीसाठा २.८० (३३.१० टक्के) होता.

सोलापूर : उजनी उणे १०.३९ टक्के

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान समजल्या जाणाऱ्या महाकाय उजनी धरणातील पाणीसाठा अचल स्वरूपात उणे १०.३९ टक्के म्हणजे ५८.१० टीएमसी एवढा शिल्लक आहे. प्राप्त परिस्थितीत अकस्मात आरक्षण म्हणून सोलापूर शहराला पिण्यासाठी आणि पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडले जात आहे. शेतीसाठी धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन नाही, तर धरणाच्या बॅक वॉटरच्या पाण्याचा उपसा शेतीसाठी होत आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवणक्षमता १२३ टीएमसी एवढी आहे. यात ६३.६५ टीएमसी पाणीसाठा अचल मानला जातो. सध्या भीमा खोऱ्यात पाऊस नसल्यामुळे धरणातील पाणीही काळजीपूर्वक वापरावे लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात २३ टक्के साठा

जून संपायला आला तरी रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरलेला नाही. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात सरासरी १४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनच्या पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणे आणि लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत २८ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता ६८ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. त्या तुलनेत या प्रकल्पात सध्या १६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.

मराठवाडय़ात पुरवठय़ातील अडचणींच्या झळा

औरंगाबाद: मराठवाडय़ातील प्रमुख ११ धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी असले तरी या वर्षीही पुरवठय़ातील अडचणींमुळे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील २७ तालुक्यांमध्ये दर साडेतीन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. केवळ दोन नगरपालिकांमध्ये दररोज पाणीपुरवठा केला जातो. पाणी कमी असण्यापेक्षाही जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्या हा मराठवाडय़ातील पाणीटंचाईच्या कळीचा मुद्दा आहे. औरंगाबादसारख्या मोठय़ा शहरात गेल्या वर्षांपासून तीन ते चार दिवसांआड एकदा पाणी येते. मराठवाडय़ातील सर्वात मोठय़ा धरणात ३३. ६६ टक्के पाणीसाठा आहे. ग्रामीण भागात पाणीसाठा नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढते आहे. जायकवाडी धरणात गेल्या वर्षी ३२.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. या वर्षी ही टक्केवारी ३३.६६ एवढी आहे

पालघर जिल्ह्यातील पाणीसाठा आटला

पालघर जिल्ह्याच्या सागरी भागात गेल्या आठवडय़ात मुसळधार पाऊस झाला. तरीही डोंगरी भागातील धरण क्षेत्रात विशेष पाऊस झाला नसल्याने धरणांचा पाणीसाठा आटला आहे. शहरांची तहान भागवण्यासाठी सध्यातरी पुरेसा साठा आहे. तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतची गावे, पालघर नगर परिषद आणि १९ गावे तसेच वसई- विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धामणी धरणात २२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील वांद्री मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ५७ टक्के पाणीसाठा आहे.

नगर जिल्ह्यात टँकर

पावसाळा सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप ४९ गावे आणि १६९ वाडय़ा-वस्त्यांवरील ७२ हजार ७३४ लोकसंख्येला अद्याप २९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर अवघा एक टँकर कमी झाला आहे. जिल्ह्यातील ९६ पैकी २२ महसूल मंडळात पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पेरण्यांनाही अपेक्षित वेग नाही. जिल्ह्यातील मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांत गेल्या वर्षी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा एकूण सुमारे ३० टक्के साठा शिल्लक आहे. 

विदर्भात तूर्तास पाणीकपात टळली

अमरावती : गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा विदर्भातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट तूर्तास तरी नाही. विदर्भातील एकूण ८३० सिंचन प्रकल्पांमध्ये ३०.१६ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर इत्यादी मोठय़ा शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये मोठय़ा प्रकल्पांच्या तुलनेत कमी साठा असला, तरी त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी तोतलाडोह प्रकल्पात ५१.३३ टक्के, अप्पर वर्धा धरणात ४५.२८ टक्के, काटेपूर्णात २९.१४ टक्के तर वाण प्रकल्पात ४१.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विदर्भातील २६ मोठय़ा प्रकल्पांमध्ये २०५६ दशलक्ष घनमीटर (३६.३० टक्के) पाणीसाठा आहे, तर ६७ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७० दलघमी (३६.३० टक्के) जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीही या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ३९.४७ आणि १८.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

राज्यातील जलचित्र

  • मुंबईची धरणे आटू लागली..
  • पुणे जिल्ह्यात १२ धरणांत शून्य टक्के साठा
  • ठाणे जिल्ह्यावर कपातीची टांगती तलवार
  • नगर जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा
  • पालघर जिल्ह्यातील पाणीसाठा आटला
  • मराठवाडय़ात पुरवठय़ातील अडचणींच्या झळा
  • रायगड जिल्ह्यात २३ टक्के जलसाठा
  • सोलापूर जिल्ह्यात उजनी उणे १०.३९ टक्के 
  • साताऱ्यात कोयनेतून वीजनिर्मितीला मर्यादा
  • उत्तर महाराष्ट्रात पाणी टंचाईचे चटके
  • विदर्भात तूर्तास पाणीकपात टळली