मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे आज एकटेच मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज ते मुंबई पोलिसांकडून आंदोलनाच्या संमतीसाठी तिसरा अर्ज करणार आहेत. दरम्यान, त्यांनी मराठा बांधवांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, तरीही अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. मला मारण्यासाठी सरकारचं षडयंत्र सुरू आहे, असंही जरांगे म्हणाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मनोज जरांगेंच्या संदर्भात मी इतकंच सांगेन की कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. पोलिसांनी त्यांचा अर्ज नाकारला आहे. पुन्हा अर्ज दिल्यानंतर पोलीस त्यावरचा निर्णय घेतील. आमची अपेक्षा इतकीच आहे की मुंबई आणि पुणे या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या उत्सवात कुठलंही विघ्न येऊ नये. आंदोलनं चालत असतात, यापूर्वीही जरांगेंनी आंदोलनं केली आहेत. यापुढेही करू शकतात. यावेळी तर त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगेंनी १४ मागण्या मान्य केल्या होत्या त्यातल्या १२ मागण्या मान्य केल्या. उरलेल्या मागण्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यांना ते समजावूनही सांगण्यात आलं आहे. मला वाटतं की आता सणासुदीच्या दिवसांत अशा पद्धतीची भूमिका न घेता लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना
आंतरवाली सराटी येथील हनुमानाचं दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यांना ओवाळले. यावेळी माध्यमांशी बोलताना सगळ्यांनी मराठा समाजाला फसवलं आहे असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मराठा समाजाने एकजुटीने राहावे आणि शांतता राखावी असे आवाहन त्यांनी केले. मी सरकारला शरण जाणार नाही, असा इशारही त्यांनी दिला. तर समाजाच्या लेकरांच्या कल्याणासाठी आपला लढा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. जरांगे यांचा पहिला मुक्काम हा पाटोदा येथे होणार आहे.
मनोज जरांगेंना आंदोलनाची संमती द्या, मराठा आंदोलकांची मागणी
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली पाहिजे अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. उत्सवाच्या नावाखाली परवानगी नाकारू नये, परवानगी नसले तरी आम्ही मुंबईला जाऊ, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. जरांगे पाटील उपोषण करतील आम्ही गणपती दर्शन करू असे सांगत मराठा बांधव मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे दिसले. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीसाठी महिला भगिनींचं गणरायाकडे साकडं घालणार असल्याचे ते म्हणाले.
