Devendra Fadnavis on PM Modi Austerity Appeal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलन वाचविण्यासाठी पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सोने खरेदीवर काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला महाराष्ट्र सरकारने सकारत्मक पद्धतीने घेतले असून, मंत्र्यांच्या ताफा कमी करण्यासह त्यांच्या विदेश दौऱ्यावर निर्बंध घातल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, विरोधकांना या उपाययोजनांचे पालन करायचे नसेल तर किमान त्यांनी याबाबत थट्टा-मस्करी करु नये, असे फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी किमान चेष्टा तरी करु नये – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्ह अनावरण केले. या कार्यक्रमानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. “सध्या वैश्विक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवं. अनेक देशांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनसारखी स्थिती आहे, पेट्रोल महाग झालंय, ३-४ दिवस इंधन मिळत नाहीये. अशा संकटाच्या काळात आर्थव्यवस्था रुळावर ठेवण्यासाठी पंतप्रधान काही उपाय सुचवत असतील तर त्याला गांभीर्याने घ्यायला हवं. आणि विरोधकांना त्यावर अंमल करायचा नसेल तर किमान त्यांनी चेष्टा तरी करु नये”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जनतेचा सहकार्य मिळेल मुख्यमंत्र्यांना विश्वास
“महागाई वाढू नये यासाठी नरेंद्र मोदी यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत त्या प्रत्येकाने थोड्या थोड्या प्रमाणात का होईना जीवनशैलीत बदल केल्यास देशाला मदत होऊ शकते. मोदींनी सहा महिन्यांसाठी केलेल्या या आवाहनाला देशातील जनता सहकार्य करेल”, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात उपाययोजना
“मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या ताफा कमी करण्यात आला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. परकीय चलन खर्च होणाऱ्या गोष्टींची खपत कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशी उत्पादनांना प्रोत्साहन कसे देता येईल याचा विचार केला जात आहे. हे लगेच होणार नाही पण, सुरुवात करायला हवी”, असे फडणवीस म्हणाले. तसेच, “देशासाठी पंतप्रधानांनी सहा महिने मागितले असतील आणि तेही न देणं अयोग्य ठरेल”, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
उच्चस्तरिय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते निर्णय घेतले?
- मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर
- मंत्री, अधिकार्यांचे विदेश दौरे रद्द
- अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको
- बहुतेक बैठका या व्हीसीने करा
- मंत्री, अधिकार्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा
नागपूर विमानतळ
“नागपूर विमानतळ ब्राऊनफिल्ड विमानतळ म्हणून नव्याने विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक निविदा दिली होती. पण, यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक होती. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली असून, यामुळे नागपूरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल आहे”, असे फडणवीस म्हणाले.
