राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजासाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेतीमधील वीज जोडणीची जुनी बिलं माफ करण्याची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर शेतकऱ्यांचे एकच भाऊ देवाभाऊ देवाभाऊ या घोषणा करण्यात आल्या.
देवेंद्र फडणवीस यांची घोषणा नेमकी काय?
शेतीला पाणी देण्यासाठी साडेसात हॉर्स पॉवरचे जे मोटारपंप वापरले जातात त्यांना सध्या बिल येत नाही. मात्र, यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावाने खात्यात जमा आहेत. त्याची वसूली कधीही होऊ शकते. त्यामुळे शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र, आमच्या सरकारने निर्णय घ्यायचं ठरवलं आहे की, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतचं जे जुनं बिल आहे. ४८ हजार कोटी रुपयांचं जुनं बिल वसुल करायचं आहे ते ४८ हजार कोटी रुपयांची जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि नव्याने त्याला पाटीवर इतिहास लिहता आला पाहिजे, यादृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केल्याबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात कर्जमाफीबाबत तपशीलवार माहिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.
शेती क्षेत्रात ९५ हजार कोटींची गुंतवणूक
आज खरं म्हणजे शेती क्षेत्रातली गुंतवणूक आपण वाढवली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून आपण जो पैसा देतो आहे तो ९५ हजार कोटी रुपये आहे. हा निधी कर्ज माफीच्या व्यतिरिक्त हा निधी आहे. शेती क्षेत्रात आपण AI चा वापर सुरु केला आहे. आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा आहे. इस्रायलची शेती पाहिली तर तिकडे फर्टिगेशन आहे. ठिबक सिंचन आहे पण पूर्ण ऑटो आहे. जेवढं सीसी गेलं पाहिजे तेवढंच जातं. त्यामुळे जमीन चांगली राहते आणि खर्च कमी होतो. अशा पद्धतीचे विषय आपल्याला आणावे लागतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रासायनिक खतांमुळे शेतीची अवस्था वाईट होते आहे हे चित्रही आपल्याला बदलायचं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज घडीला राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देत आहोत. या वर्षाअखेर आपला प्रयत्न आहे की, आपण १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा प्रयत्न करु, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
