Devendra Fadnavis On NCP Merger : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज (१० फेब्रुवारी) सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यावर दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत.
आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“अजित पवार यांच्या निधनानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यांचा शोक प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्यात आला. सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पहिली मंत्रिमंडळाची बैठक होती. मात्र, दुखवटा असल्यामुळे सुनेत्रा पवार यांचं आम्ही फक्त शब्दसुमनाने स्वागत केलं”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“मला विश्वास आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात अगदी कालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील त्यांना चांगलं यश मिळालं आणि भविष्यात देखील त्यांचा पक्ष चांगलं काम केरल. बाकी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे जे विषय आहेत, ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत. त्या विषयाबाबत मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्याबाबत योग्य ते बोलेल. पण आज ती वेळ आलेली नाही. जेव्हा ती वेळ येईल तेव्हा ते आम्हाला अधिकृतरित्या सांगतील की आमचं काही ठरलं आहे, तेव्हा मी त्यावर प्रतिक्रिया देईन. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे?”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांचं मोठं भाष्य
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत मोठं भाष्य केलं.
रोहित पवार म्हणाले की, “ज्या खुर्चीत बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे, त्याच खुर्चीत आज सुनेत्राकाकींना पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय. या खुर्चीत आज अजितदादा नाहीत याचं अतीव दुःख आहे, पण सुनेत्राकाकी आहेत याचा आनंदही आहे. अजितदादांची उणीव कदापि भरुन काढता येणार नाही. पण सुनेत्राकाकी या अजितदादांच्या शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने काम करताना राज्यभरातील सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील, याचा पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा!”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
‘काही नेत्यांची इच्छा नसली तरी…’
“तसंच उपमुख्यमंत्री पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं, ही काही नेत्यांची इच्छा नसली तरी राज्यभरातील लाखो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, त्यामुळं तीही त्या पूर्ण करतील असा विश्वास आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
